Maharashtra Politics: “बच्चू कडूंचा प्रेमभंग झाला, त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 12:29 PM2022-10-27T12:29:50+5:302022-10-27T12:30:56+5:30
Maharashtra News: बच्चू कडू यांना आता काहीच किंमत राहिली नाही. त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाऊन आपला स्वाभिमान गहाण टाकला, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेले आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. रवी राणा यांच्या आरोपांमुळे संतप्त झालेल्या बच्चू कडू यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. यावरून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत असून, शिंदे गट आणि भाजपवर निशाणा साधला जात आहे. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बच्चू कडू यांना खोचक टोला लगावला आहे.
पन्नास खोक्यांचा आरोप विरोधकांकडून होत असताना आम्ही दुर्लक्ष केले. पण सत्तेत सहभागी असलेले रवी राणा यांच्याकडून चुकीचे आरोप झाल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. राणांच्या आरोपामुळे शिंदे सरकारला पाठिंबा देणारे इतर आमदारही दुखावले आहेत. आम्ही आठ ते दहा आमदार एकत्र बसणार आहोत. प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशीही आपण चर्चा करू. १ नोव्हेंबरपर्यंत राणा यांनी माफी मागितली नाही किंवा आरोपाशी संबंधित पुरावे दिले नाही तर वेगळा निर्णय घेऊ व बच्चू कडू स्टाईलनेच आरोपांना उत्तर देऊ, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. यावरून आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
बच्चू कडू यांना मंत्रिमंडळात घ्यायला हवे होते
बच्चू कडू यांनी शिंदे सरकारला दिलेल्या इशाऱ्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, बच्चू कडू यांचा प्रेमभंग झाला आहे. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला हवे होते. बच्चू कडू यांना आता काहीच किंमत राहिली नाही, त्यांचा विश्वासघात झाला आहे. ते स्वाभिमानी नेते आहेत मात्र बच्चू कडू यांनी शिंदे यांच्यासोबत जाऊन आपला स्वाभिमान गहाण टाकला, अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
दरम्यान, बच्चू कडू आणि रवी राणा आमने-सामने आहेत. उद्या भाजप आणि शिंदे गट एकोमेंकांच्या उरावर बसतील. शिंदे गटात सर्वच जण स्वार्थासाठी गेले. मात्र आता एकालाही मंत्रीपद मिळणार नाही, असा दावा ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"