भ्रष्टाचार केलेले लोक खांद्याला खांदा लावून शिंदेंसोबत आहेत; अंबादास दानवेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 03:20 PM2023-06-22T15:20:56+5:302023-06-22T15:21:55+5:30
मुंबई महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीच्या धाडीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
छत्रपती संभाजीनगर : मुंबई महापालिकेतील कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी ईडीच्या धाडीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महापालिकेतील भ्रष्टाचारावरून शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत. कोविड काळात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. दरम्यान, ईडीच्या धाडीवरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले.
"ईडीच्या धाडी पडत आहे, जाणीवपूर्वक शिवसैनिकांना टार्गेट केले जातंय. मुख्यमंत्री हे ज्यांच्या खांद्याला खांदे लावून बसतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. भ्रष्टाचार केलेले लोक खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत, मात्र प्रामाणिक काम करणाऱ्यांवर धाडी टाकतात. भ्रष्टाचारी मोठे शिंदे आणि छोटे शिंदेंसोबत असतात. जाणीवपूर्वक ईडीच्या कारवाया होत असून शाखा नाही तर नारायण राणे यांचा बंगला किती अनधिकृत होता आणि काय कारवाई केली हे पाहणे महत्वाचे आहे", अशा शब्दांत दानवेंनी राज्य सरकारवर टीका केली.
तसेच ४ पोलीस आले आणि शाखेत गेले म्हणजे आम्ही घाबरलो असे नाही, आम्ही ईडीला घाबरत नाही हे तर ४ पोलीस आहेत. इतर पक्षांच्या पण शाखा आहेत, एकच शाखा नाही मुंबईमध्ये, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करावी, अशी मागणी दानवेंनी केली. अजित पवार यांनी विरोधीपक्षनेतेच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केल्यानंतर दानवे म्हणाले की, अजित पवारांनी पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत संघटनेचे काम वाढविण्यासाठी अजित पवार तसे म्हणाले असतील.
"जनता अब्दुल सत्तारचा तोरा उतरवल्याशिवाय राहणार नाही"
मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना त्यांनी म्हटले, "अब्दुल सत्तार यांच्यावर दररोज आरोप होतात. लोक भीतीने शांत बसायचे. अब्दुल सत्तार यांच्यावर एक नाही तर हजारो आरोप होऊ शकतात असे अब्दुल सत्तार यांचे काम आहे. अब्दुल सत्तार यांचे शेकडो आरोप आहेत. आधी महसूल मंत्री असताना ही घोटाळा केला आहे, जनता अब्दुल सत्तारचा तोरा उतरवल्याशिवाय राहणार नाही. मी त्याच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याची वाट पाहत आहे. मग कळेल कोणती कोणती त्यांची अब्रू बाकी आहे."