"फडणवीस सध्या भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरतायत आणि महाराष्ट्र लुटून खाण्याचा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 08:03 AM2022-12-28T08:03:26+5:302022-12-28T08:04:10+5:30

"नाकासमोर भ्रष्टाचार सुरू आहे, पण फडणवीसांना काहीच दिसत नाही, ऐकू येत नाही. त्यांना कर्णपिशाचाने ग्रासले आहे काय?" शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सवाल.

shiv sena uddhav balasaheb thackeray saamana editorial targets dcm devendra fadnavis government mla land allegations maharashtra vidhan sabha 2022 | "फडणवीस सध्या भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरतायत आणि महाराष्ट्र लुटून खाण्याचा..."

"फडणवीस सध्या भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरतायत आणि महाराष्ट्र लुटून खाण्याचा..."

googlenewsNext

‘विधानसभेत भ्रष्टाचारविरोधी हंगामा सुरू आहे. सरकारातील मंत्री रोज नवे भूखंड पचवून ढेकर देत आहेत व फडणवीस या भ्रष्टाचाराचे समर्थन करीत आहेत. सभोवती भ्रष्टाचारविरोधी बॉम्ब फुटत असतानाही ते म्हणतात, ‘‘कुठे काय? मला तर लवंगी फटाक्याचाही आवाज ऐकू येत नाही.’’ या जादूटोण्यास काय म्हणावे?’ असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय.

‘नाकासमोर भ्रष्टाचार सुरू आहे, पण फडणवीसांना काहीच दिसत नाही, ऐकू येत नाही. त्यांना कर्णपिशाचाने ग्रासले आहे काय? तसे असेल तर महाराष्ट्राच्या भविष्याविषयी आम्हाला चिंता वाटते! हनुमानाच्या शेपटास आग लावून देण्याचा उपद्व्याप त्या काळात झाला. त्या शेपटाने रावणाची लंका जळून गेली हे विसरू नका!’ असं म्हणत अग्रलेखातून इशाराही देण्यात आलाय.

काय म्हटलेय अग्रलेखात?
'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘विरोधी पक्ष कसला बॉम्ब फोडणार? त्यांच्याकडे लवंगी फटाकादेखील नाही.’ फडणवीस यांचे हे विधान आश्चर्यकारक आहे. फडणवीस सध्या भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरत आहेत व महाराष्ट्र लुटून खाण्याचा हट्ट सोडायला वेताळ तयार नाही. फडणवीस यांना रोज उठून भ्रष्टाचार व लुटमारीच्या नव्या प्रकरणाची वकिली करावी लागते. विधानसभेत विरोधकांकडून रोज भ्रष्टाचारविरोधी बॉम्ब फोडले जात आहेत. फडणवीस यांना ते ऐकू जात नसतील तर तो त्यांचा राजकीय कर्णदोष म्हणावा लागेल,' असे सामनाच्या संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलेय.

'… तो भ्रष्टाचार वाटत नाही'
'भ्रष्टाचाराविरोधात विरोधकांनी विधिमंडळात तुमच्या नाकासमोर बॉम्ब फोडले, पण १६ भूखंडांचा भ्रष्टाचार आमच्या फडणवीस साहेबांना भ्रष्टाचार वाटत नाही. विरोधकांनी फोडलेला हा बॉम्ब लवंगी फटाक्याच्याही तोडीचा नाही, असे वाटणे हे सरकारच्या निर्ढावलेपणाचे लक्षण आहे. फडणवीस हे कोणत्या जादूटोण्याच्या दबावाखाली काम करीत आहेत? की विरोधकांनी भ्रष्टाचाराविरुद्ध फोडलेले बॉम्ब त्यांना अस्वस्थ करीत नाहीत,' असे यात म्हटले आहे.

'तो लवंगीच्या तोडीचा वाटला नाही'
'काही कोटींचा व्यवहार या कामी टेबलाखालून झाला व समस्त विरोधी पक्षांनी भूखंड घोटाळय़ांचा हा नवा बॉम्ब फोडूनही फडणवीस यांना तो लवंगीच्या तोडीचा वाटला नाही. म्हणजे त्यांचा इशारा असा आहे की, महाराष्ट्राने आता प्रगती केली असून शे-पाचशे कोटींचा गैरव्यवहार म्हणजे चिल्लर आहे. यापेक्षा काही मोठा घोटाळा असेल तर बोला! आमच्या राज्यात शे-पाचशे कोटींचे घोटाळे होणारच असेच फडणवीस यांना सांगायचे आहे काय? संजय राठोड, उदय सामंत, शंभू देसाई अशा मंत्र्यांचेही घोटाळे समोर आले आहेत व ही भ्रष्टाचाराची अंतर्वस्त्रे धुण्याचे काम महाराष्ट्रात फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना करावे लागत आहे,' असे म्हणत निशाणा साधण्यात आलाय.

Web Title: shiv sena uddhav balasaheb thackeray saamana editorial targets dcm devendra fadnavis government mla land allegations maharashtra vidhan sabha 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.