Maharashtra Politics: “मुख्यमंत्र्यांसह ५० खोके आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 11:55 AM2022-11-01T11:55:04+5:302022-11-01T11:57:25+5:30
Maharashtra News: शिंदे गट आणि राणा दाम्पत्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे बाहुले आहेत, अशी टीका युवासेना नेते शरद कोळींनी केली आहे.
Maharashtra Politics: एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेकडून सातत्याने शिंदे गटावर टीका होताना दिसत आहे. बंडखोर आमदारांनी ५० खोके घेतल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला पाठिंबा दिलेले आमदार बच्चू कडू आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेने शिंदे गटावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांसह ५० खोके आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, अशी टीका करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या राणा दाम्पत्यावर शरद कोळी यांनी शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. राज्यात राणा कंपनीने तमाशाचा फड मांडलाय, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे बाहुले आहेत. ते जसे हलवीतील हे तसे नाचतात, ती तामशागिर करणारी हे टोळी आहे, असा घणाघात शरद कोळी यांनी केला आहे.
५० खोके आमदारांचा कार्यक्रम केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही
५० खोके घेतलेले आहेत हे एकमेकांना माहिती आहे. हे प्रकरण बाहेर आले तर अनेक मासे गळाला लागतील. या आमदारांचा दिल्लीतूनच गेम झाला आहे. मुख्यमंत्री आणि हे ५० खोके आमदारांना लवकरच भाजपची खेळी कळेल. या ५० च्या ५० आमदारांचा बिमोड लवकरच होणार आहे. ही सगळी भाजपची खेळी होती, तेही त्यांना कळून चुकणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांसह ५० खोके आमदारांचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, अशी टीका शरद कोळी यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"