या पैशाचे धनी कोण, हे भाजपाच्या पोपटांनी जाहीर करावे; शिवसेनेचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 08:05 AM2022-09-23T08:05:10+5:302022-09-23T08:15:29+5:30

महाराष्ट्रातील शिवसेना फोडण्यासाठी व सध्याचे सरकार बनविण्यासाठी हा पैसा कसा कामी आला यावर बॅण्डबाजा वाजवायला हवा.

Shiv Sena Uddhav Thackeray attack on BJP over drugs detained in Gujarat | या पैशाचे धनी कोण, हे भाजपाच्या पोपटांनी जाहीर करावे; शिवसेनेचा भाजपावर घणाघात

या पैशाचे धनी कोण, हे भाजपाच्या पोपटांनी जाहीर करावे; शिवसेनेचा भाजपावर घणाघात

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्रातील १० टक्के कमिशनखोरीवर स्वतःचा बुलबुल वाजविणाऱ्यांनी गुजरातच्या ड्रग्जच्या तस्करीचा पैसा कोठे जातोय यावर बॅण्डबाजा वाजवायला हवा. या पैशाचे धनी कोण, हे भाजपच्या पोपटांनी जाहीर करावे. ‘सी समरी’ करून प्रकरण दाबावे असा हा विषय नाही. राष्ट्रीय सुरक्षेचा, तरुण पिढीला वाचविण्याचा हा विषय आहे. गुजरात तुमच्याइतकाच आमच्याही भावनेचा विषय आहे. आमच्या जुळय़ा भावास पाकिस्तान, इराण, अफगाणिस्तानमधील ड्रग्ज माफियांच्या ताब्यात कसे जाऊ द्यावे? असा सवाल सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाला विचारला आहे. 

तसेच गुजरातला बदनाम करण्याचे कारस्थान काही लोक करीत असल्याची भीती पंतप्रधान मोदी यांनी भूजच्या एका कार्यक्रमात व्यक्त केली. गुजरातची बदनामी घरातलेच लोक करीत आहेत. शोधा म्हणजे सापडेल. गेल्या ५ वर्षांत आपल्या देशात अब्जावधीचे ‘ड्रग्ज’चे साठे जप्त करण्यात आले. हे साठे पकडण्यात आले, पण जे पकडले गेले नाहीत ते अमली पदार्थांचे साठे देशभरात तरुण पिढी उद्ध्वस्त करीत असतील. ७२ वर्षांनंतर आपल्या देशात नामिबियातून आठ चित्ते आणले गेले. त्या उत्सवातून आपले सत्ताधारी बाहेर पडले असतील तर त्यांनी देशात धो-धो येणाऱ्या अमली पदार्थांच्या साठ्यांकडे गांभीर्याने पाहायला हवे असा टोला शिवसेनेने सत्ताधाऱ्यांना लगावला. 

सामना अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
‘उडता पंजाब’ने सगळय़ांचीच झोप उडवली आहे. त्यापाठोपाठ गुजरात राज्यात सर्वाधिक अमली पदार्थांचे साठे पकडले जात आहेत. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर २६ परदेशींच्या पोटातून १०० कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. जेथून आठ चित्ते आले त्याच आफ्रिका व आसपासच्या प्रदेशातून हे परदेशी पाहुणे पोटात ड्रग्ज घेऊन आले. 

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्ज माफियांनी गुजरातमार्गे हिंदुस्थानात घुसखोरी केली आहे. मागील सहा महिन्यांत गुजरातच्या किनारपट्टीवर 30 हजार किलोचे ड्रग्ज पकडण्यात आले. या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ५ हजार कोटी आहे. 

‘वेदांता-फॉक्सकॉन’ प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळवून नेताच महाराष्ट्रावर अन्याय झाल्याची भावना व संताप व्यक्त झाला. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यावर सांगितले, ‘‘गुजरातमध्ये फॉक्सकॉन गेला म्हणून काय बिघडले? गुजरात पाकिस्तानमध्ये आहे काय?’’ श्रीमान फडणवीस, तुमचा मुद्दा योग्य आहे. गुजरात पाकिस्तानमध्ये नाही, पण गुजरातमध्ये पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तानशी संबंधित ‘ड्रग्ज माफिया’ टोळीचे कनेक्शन उघड झाले आहे. 

भारत जोडो यात्रेस निघण्याआधी राहुल गांधी गुजरातला गेले व त्यांनी गुजरातमध्ये वाढत चाललेल्या नशेच्या कारभारावर हल्ला केला. ‘गुजरात हे ड्रग्जचे केंद्र बनलेय. मुंद्रा बंदरातून सगळय़ा ड्रग्जची तस्करी केली जातेय. डबल इंजिन सरकारमध्ये कोण बसलेय जे सातत्याने ड्रग्ज आणि दारू माफियांना संरक्षण देत आहे व गुजरातच्या युवकांना नशेबाजीत लोटत आहेत. 

ड्रग्ज माफियांवर गुजरातचे सरकार कोणतीच कारवाई करीत नाही. हेच ‘गुजरात मॉडेल’ आहे’, असा घणाघात राहुल गांधींनी करताच त्यांची अक्कल काढली गेली. गुजरातमध्ये दहा हजार कोटींचा अवैध दारू व्यापार कोणाच्या संरक्षणात सुरू आहे, असा सवाल अरविंद केजरीवाल यांनी विचारताच त्यांच्या दिल्लीतील मंत्र्यांवर छापे पडतात, पण गुजरातमध्ये सर्व सुरळीत चालते. 

गुजरातमधील मुंद्रा बंदरातून जून महिन्यात 500 किलोंचे कोकेन जप्त झाले. पाठोपाठ जखाऊ बंदराजवळ 250 कोटींची हेरॉईन तस्करी उजेडात आली. याच काळात पाकिस्तानी बोटींतून 50 किलोचा हेरॉईनचा साठा गुजरातला आणला जात होता. 50 किलो हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 250 कोटी रुपये आहे. 

मुंद्रा बंदरातून जे 500 कोटींचे कोकेन जप्त केले ते इराणमधून आले. मिठाच्या पिशव्या असल्याचे सांगून ते आणले गेले. ते पकडले गेले असले तरी अशा शेकडो कोटींच्या ‘मिठाच्या पिशव्या’ गुजरातमार्गे देशात गेल्या असतील. गुजरातमधील याच बंदरावरून 15 सप्टेंबर 2021 रोजी तीन हजार किलोचे ‘ड्रग्ज’ पकडले गेले तेव्हा देशभरात खळबळ माजली होती. 

याच मुंद्रा पोर्टवरील कारवाईत दोन दिवसांपूर्वी 50 कोटी रुपयांची ‘ई-सिगारेट’ नामक नशिली खेप जप्त केली. चीनमधून आलेल्या दोन संशयास्पद कंटेनरमधून ई-सिगारेटची 2 लाख 400 पाकिटे मुंद्रा बंदरात पोहोचली. हिंदुस्थानात ‘ई-सिगारेट’वर बंदी आहे. म्हणजे आता पाकिस्तानबरोबर चीनही गुजरातच्या भूमीवर नशेचा धूर सोडत आहे. 

मुंबई गुन्हे शाखेने ऑगस्ट महिन्यात गुजरातमधील ‘एमडी ड्रग्ज’ कारखानाच उद्ध्वस्त केला. त्याच वेळी 1406 कोटींचा ‘एमडी’ साठा जप्त केला. हे ‘ड्रग्ज’ गुजरातच्या अंकलेश्वर येथील औद्योगिक वसाहतीत बनवले जात होते. ही बाब गंभीर असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. 

गोव्यात सोनाली फोगटचा मृत्यू अमली पदार्थाच्या सेवनाने झाल्याचे उघड होताच गोव्याच्या किनारपट्टीवरील ते हॉटेलच पाडण्यात आले व पुढच्या तपासासाठी तेथे सीबीआय पोहोचले, पण गोव्याच्या अनेक किनारपट्टय़ा रशियन, नायजेरियन ड्रग्ज माफियांनी ताब्यात घेतल्या आहेत व तेथे पोलीसही पाय ठेवायला घाबरतात. 

गोव्यातला ‘ड्रग्ज’ पुरवठा गुजरातमार्गे होतो काय, हा तपासाचा भाग आहे; पण सीबीआयची पथके तपासासाठी गुजरातला पोहोचली नाहीत. ड्रग्ज तस्करी व त्यातील आर्थिक उलाढालीचा तपास करणे हे ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांचे काम आहे, पण हजारो कोटींच्या अमली पदार्थांची तस्करी व व्यवहार उघड होऊनही ‘ईडी’ने त्याची दखल घेतली नाही. 

आंतरराष्ट्रीय माफियांनी गुजरातमार्गे ड्रग्ज तस्करीचा मोठा गोरखधंदा चालविल्याचे उघड झाले आहे. हे ड्रग्जच्या माफिया पूर्वी पंजाबमार्गे तस्करी करायचे. नंतर दक्षिणमार्गे तस्करी सुरू केली. आता त्यांनी गोरखधंद्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून गुजरातकडे मोर्चा वळवला. 

‘नोटाबंदी’नंतर अमली पदार्थांच्या व्यापारास व बनावट नोटा छापण्याच्या धंद्यास आळा बसेल असे आपल्या पंतप्रधानांचे वचन होते. मात्र उलट हे दोन्ही गोरखधंदे चित्त्यांप्रमाणे वेगाने पुढे जात आहेत व त्यांचे मुख्य केंद्र गुजरात बनले आहे. पाकिस्तानी, इराणी, अफगाणी तस्करांना गुजरातची किनारपट्टी व भूमी इतकी सुरक्षित का वाटत आहे? त्यांच्या पाठीशी कोणती महाशक्ती आहे? 

तस्करीचा पैसा नक्की कोठे वळवला जात आहे? महाराष्ट्रातील पन्नास आमदारांना गुजरातमध्ये आश्रय दिला हे तर जगजाहीर आहेच. शिवाय त्यांना प्रत्येकी 50 खोकी दिली हे आरोपही सर्रास होतच आहेत. हे हजारो कोटी याच ड्रग्ज तस्करीचा भाग आहेत काय? असे अनेक राष्ट्रहिताचे प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत. गुजरात हे ‘ड्रग्ज’चे आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र बनले असेल तर महाराष्ट्राला चिंता वाटावी अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होईल. 

गुजरातमधील बंदरावर कंटेनरमधून भंगार सामानातून अमेरिकन गांजा आणि अफगाणी हेरॉईन मोठय़ा प्रमाणात आणण्यात येते. गुजरातच्या सीमा पाकिस्तानला लागून आहेत व तेथे ‘बीएसएफ’ची सुरक्षा व्यवस्था आहे. प. बंगालच्या सीमेवरून प्राण्यांची तस्करी होते व त्या तस्करीत तृणमूल काँग्रेसचे नेते सहभागी असल्याचा आरोप भाजपकडून होताच तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी कडक उत्तर दिले. त्यांनी भाजपला आरसाच दाखवला. 

सीमेवर बीएसएफ म्हणजे सीमा सुरक्षा दल तैनात आहे. ‘बीएसएफ’ कोणाच्या अखत्यारीत येते? त्यामुळे या तस्करीत कोण सामील आहे व हा तस्करीचा पैसा कोणाच्या खिशात जातोय? अशा फैरी बॅनर्जी यांनी झाडताच भाजपवाल्यांची तोंडे पाहण्यासारखी झाली. गुजरातमधील वाढत्या ड्रग्ज तस्करीने हेच प्रश्न निर्माण केले आहेत. 

महाराष्ट्रातील शिवसेना फोडण्यासाठी व सध्याचे सरकार बनविण्यासाठी हा पैसा कसा कामी आला यावर बॅण्डबाजा वाजवायला हवा. या पैशाचे धनी कोण? त्यातील कोण कोण जेलात जाणार? हे भाजपच्या पोपटांनी जाहीर करावे. 

Web Title: Shiv Sena Uddhav Thackeray attack on BJP over drugs detained in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.