शिवसेना संपवून दाखवा, उद्धव ठाकरेंचे भाजपच्या जे.पी. नड्डांना खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 09:27 AM2022-08-02T09:27:11+5:302022-08-02T09:27:38+5:30

भाजप प्रादेशिक अस्मिता चिरडतोय : उद्धव ठाकरे 

shiv sena uddhav thackeray challenges bjp j p nadda over shiv sena over eknath shinde local political parties | शिवसेना संपवून दाखवा, उद्धव ठाकरेंचे भाजपच्या जे.पी. नड्डांना खुले आव्हान

शिवसेना संपवून दाखवा, उद्धव ठाकरेंचे भाजपच्या जे.पी. नड्डांना खुले आव्हान

googlenewsNext

भाजपसोबत लढणारा आज कोणताच राजकीय पक्ष, कोणताच विचार राष्ट्रीय स्तरावर नाही, इतर संपले. जे संपले नाहीत ते संपतील. फक्त आपणच टिकणार, शिवसेनाही संपणार हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे. त्यांनी शिवसेना संपवूनच दाखवावी, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. भाजप प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत असल्याची टीकाही त्यांनी केली.

मातोश्री निवासस्थानी आयोजित पत्र परिषदेत ठाकरे म्हणाले की,  भाजपचा वंश कुठून सुरू झाला, हे पाहायचे आहे. इतर पक्षातील लोक त्यांच्याकडे येत आहेत, तर भाजपचा वंश कोणता आहे? यापुढे केवळ भाजपच  टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेणारे आहे.  सर्वच लोकांनी आता डोळे उघडून पाहायला पाहिजे. ते जिथे नेऊ इच्छितात तिथे नेऊ द्या. त्यात मदत करायची की नाही, हे सामान्य नागरिकांनी ठरवायची वेळ आली आहे.

सोबत येतील ते काही काळ आपले गुलाम. काम संपल्यावर नवीन गुलाम येतील. हे गुलाम जातील. पुन्हा नवे येतील. प्रादेशिक अस्मिता संपवून टाकायची, हिंदूत फूट पाडायची, राजकारण्यांच्या तुंबड्या भरायच्या, हे भाजपचे कारस्थान आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

जे. पी. नड्डा बोलले ते ठाकरेंच्या शिवसेनेबाबत  
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आता राहिली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेबाबत ते म्हणालेले नाहीत. ही वस्तुस्थिती कृपया लक्षात घ्या. जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नका, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. संजय राऊत यांच्यावरील कारवाई ही पूर्णपणे पुराव्यांच्या आधारावर सुरू आहे. न्यायालयच पुढचा निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

संसदीय बहुपक्षीय लोकशाही ही देशातील भौगोलिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, सामाजिक, भाषिक विविधतेचे प्रतिनिधित्व करते. प्रादेशिक पक्ष संपुष्टात आणण्याची मानसिकता लोकशाहीविरोधी तर आहेच, पण विविधता अमान्य करणारी आहे. 
- सचिन सावंत, काँग्रेस नेते

Web Title: shiv sena uddhav thackeray challenges bjp j p nadda over shiv sena over eknath shinde local political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.