Maharashtra Politics: “वेदांता प्रकल्पाबाबत RTI अंतर्गत समोर आलेली माहिती चुकीची आणि खोटी”; ठाकरे गटाचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 03:02 PM2022-11-02T15:02:41+5:302022-11-02T15:02:51+5:30
Maharashtra News: माहिती अधिकार कायदा एवढा सुपरफास्ट कधी झाला, अशी विचारणा करत, त्यातील माहिती बनावट असल्याचा दावा ठाकरे गटाने केला आहे.
Maharashtra Politics: राज्यातून बाहेर जात असलेले प्रकल्प आणि उद्योगांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडताना दिसत आहेत. वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन यांसारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने शिवसेना आक्रमकपणे शिंदे-भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत आहे. यातच एका माहिती अधिकारांतर्गत समोर आलेल्या माहितीवरून ठाकरे गटाने सरकारवर निशाणा साधला असून, सदर माहिती खोटी आणि चुकीची असल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेदांता प्रकल्प राज्यात राहावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत. शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर वेदांता प्रकल्पासाठी बैठक झाली. महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाईमुळे, उदासिनतेमुळेच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेला, अशी माहिती MIDCकडून दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जात देण्यात आली. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप नोंदवला आहे.
RTI अंतर्गत समोर आलेली माहिती चुकीची आणि खोटी
वेदांता प्रकल्पाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत समोर आलेली माहिती चुकीची आणि खोटी आहे. सकाळी अर्ज केला आणि संध्याकाळी माहिती समोर येते, माहिती अधिकार कायदा एवढा सुपरफास्ट कधीपासून झाला? त्यामुळे यातील माहिती बनावट आहे, असा दावा अंबादास दानवेंनी केला आहे. तसेच १५ डिसेंबर २०२१ ला हा प्रकल्प केंद्र सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आला. ५ जानेवारी २०२२ ला वेदांताने या प्रकल्पाचा प्रस्ताव महाराष्ट्रासमोर ठेवला. ११ जानेवारीला महाराष्ट्राने महाराष्ट्राने प्रिंसिपल अॅप्रुव्हल दिले. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला आहे. त्यामुळे शिंदेसरकारच्या वतीने केले जाणारे दावे आणि माहिती अधिकारातील माहिती चुकीची आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता प्रकल्पासह अन्य प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार जबाबदार असून, चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे सर्व मुद्दे खोडून काढले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"