'... त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही,' ठाकरे गटाची शिंदेंवर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 07:35 AM2023-06-14T07:35:23+5:302023-06-14T07:37:11+5:30

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले होते.

shiv sena uddhav thackeray group saamana editorial targets cm eknath shinde modi shinde advertisement paper | '... त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही,' ठाकरे गटाची शिंदेंवर टीका 

'... त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही,' ठाकरे गटाची शिंदेंवर टीका 

googlenewsNext

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले. या पार्श्वभूमीवर, मी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्कमपणे सोबत आहोत, शिवसेना-भाजपची युती आगामी सर्व निवडणुका जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. परंतु मिंधे गटाची फुकाची जाहिरातबाजी म्हणजे वरवरची रंगसफेदी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही,' असं म्हणत ठाकरे गटानं एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. 

'शिवसेनाप्रमुखांबाबतचे यांचे प्रेम व आदर म्हणजे निव्वळ ढोंग होते हे कालच्या जाहिरातबाजीने स्पष्ट केले, पण जो बाळासाहेबांचा झाला नाही तो मोदींचा तरी होईल का? आतापर्यंत आपण सगळ्यांनी खूप कल्पक जाहिराती पाहिल्या असतील, पण अशी जाहिरात होणे नाही!' असं म्हणत ठाकरे गटाने सामनाच्या संपादकीयमधून निशाणा साधलाय.

काय म्हटलेय संपादकीयमध्ये?

आतापर्यंत या बेकायदा सरकारने असंख्य जाहिराती दिल्या, पण काल मिंधे गटातर्फे प्रसिद्ध झालेल्या एका पूर्ण पान जाहिरातीने फडणवीसांसह त्यांच्या 105 आमदारांच्या काळजाचे पाणी पाणीच झाले आहे. सर्वच वृत्तपत्रांत कोटय़वधी रुपये खर्च करून अगदी पहिल्या पानावर ‘मोदी-शिंद्यां’च्या फोटोसह जाहिराती प्रसिद्ध झाल्या. त्या जाहिरातीतून देवेंद्र फडणवीस गायब आहेत. ही जाहिरात सरकारी नसून चोरलेल्या बनावट शिवसेनेची आहे, असे म्हणत संपादकीयमधून टीका करण्यात आलीये.

'त्यांचा गट मोदींच्या पायाशी लीन करून ठेवला'

'जाहिरातीत पंतप्रधान मोदी यांचा फोटो खुबीने वापरला, पण फडणवीस कोठेच नाहीत. जाहिरात सरकारी नसल्यामुळेच फडणवीसांवर फुली मारली असा त्यावर खुलासा असेल, तो तितकासा खरा नाही; पण ‘आम्हीच खरी शिवसेना व आम्हीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार’ असे ढोल पिटणाऱ्यांच्या या जाहिरातीत मोदी आहेत, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेदेखील पूर्णपणे गायब आहेत. यावर भाजप व शिंदे गटाच्या टिल्ल्या-चिल्ल्या टिनपाट प्रवक्त्यांचे काय म्हणणे आहे? एकाच वेळी फडणवीस यांना धक्का देणाऱ्या व शिवसेनाप्रमुखांकडे दुर्लक्ष करणाऱ्या जाहिरातींचे प्रयोजन काय? प्रश्न एका जाहिरातीचा नाही, तर स्वतःस शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांनी त्यांचा गट मोदींच्या पायाशी लीन करून ठेवला हा आहे,' असं यात नमूद करण्यात आलेय.

'... तो प्रचार संपुष्टात आणला'

एकनाथजी शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे व देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे.’’ याचा अर्थ असा की, गेल्या फक्त 9-10 महिन्यांत शिंदे यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत फडणवीस यांच्यावर चढाई केली. मोदी राष्ट्रात व शिंदे महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत असल्याच्या जाहिरातबाजीने भाजपवाल्यांची तोंडे महाराष्ट्रात काळी ठिक्कर पडली आहेत. एक वर्षापूर्वी ‘देशात नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र’ असा प्रचार सुरू होता. तो प्रचार या जाहिरातीने संपुष्टात आणल्याचं म्हणत यातून टीका करण्यात आलीये.

'निवडणुका हाच पर्याय'

'लोकांचा पाठिंबा किती व कसा हे अजमावयाचे असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका हाच पर्याय आहे, पण ‘मिंधे’ मंडळ निवडणुकांपासून पळ काढत आहे. ज्या ‘सर्व्हे’चा हवाला दिला जात आहे तो नक्की कोठे केला? मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताब्यात मलबार हिलचे तीन सरकारी बंगले आहेत. बहुधा याच तीन बंगल्यांत हा सर्व्हे केलेला दिसतो,' असं म्हणत ठाकरे गटानं टीकेचा बाण सोडलाय.

Web Title: shiv sena uddhav thackeray group saamana editorial targets cm eknath shinde modi shinde advertisement paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.