'पाळणा इकडे, दोरी हलवणारे दिल्लीत असं सध्या चित्र;' मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटाचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 08:20 AM2023-06-07T08:20:19+5:302023-06-07T08:21:34+5:30
'पहिल्या विस्ताराला नऊ महिने होऊन गेले तरी दुसऱ्या विस्ताराचा पाळणा हलायला तयार नाही,' ठाकरे गटाचा टोला
राज्यात शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलीये. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सरकारवरील धोका टळलाय. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तार करावा अशी मागणी इच्छुकांनी लावून धरली आहे. याच मंत्रिमंडळ विस्तारावरून ठाकरे गटानं शिंदे फडणवीस सरकारवर टीकेचा बाण सोडलाय.
'मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यावर पहिला विस्तार करायला ४१ दिवस लागले व त्या विस्तारास नऊ महिने होऊन गेले तरी दुसऱ्या विस्ताराचा पाळणा हलायला तयार नाही. कारण सगळाच ‘वांझ’ कारभार सुरू आहे. पाळणा इकडे व दोरी हलवणारे दिल्लीत असे चित्र आहे,' असे म्हणत ठाकरे गटाने सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर निशाणा साधला.
काय म्हटलेय संपादकीयमध्ये?
'महाराष्ट्रात गतिमान सरकार आल्याची पुंगी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस वाजवत असतात. आपले सरकार ‘डबल इंजिन’वाले आहे असे ते म्हणतात. पण इंजिनास ‘तेलपाणी’ करण्यासाठी त्यांना वारंवार दिल्लीच्या सर्व्हिसिंग स्टेशनला जावे लागते. यालाच जर हे लोक गतिमान सरकार म्हणत असतील तर काय बोलायचे? सत्य असे आहे की, तथाकथित गतिमान सरकारचा वेग बैलगाडीपेक्षा कमी आहे,' असे म्हणत ठाकरे गटानं सरकावर टीका केली आहे.
दिल्लीला हेलपाटे मारून थकले
वर्षभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही आणि विस्तार व्हावा यासाठी मिंधे-फडणवीस दिल्लीस हेलपाटे मारून थकले आहेत. जे सरकार वर्षभर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची हिंमत दाखवू शकले नाही त्यांनी गतिमानतेच्या गोष्टी कराव्यात याचे आश्चर्य वाटत असल्याचं संपादकीयमध्ये नमूद करण्यात आलेय.
...त्यावर बोलायला तयार नाही
गेल्या दोनेक वर्षांपासून महाराष्ट्राची राजधानी मुंबई नगरीस महापौर नाही. मुंबई नगरी महापौरविना उघडीबोडकी आहे. महापौर नाही, महापालिकेत लोकनियुक्त सरकार नाही. मंत्रालयातून त्यांना हवा तसा कारभार हाकला जात आहे. बरे, महापौर व निवडणुका का नाहीत? तर निवडणुका घेतल्या तर शिवसेनेचाच महापौर होईल या भयाने गतिमान सरकारने मुंबईच्या महापौरपदाचा कोंबडा झाकला आहे. भारतीय जनता पक्षाची बदके अधूनमधून आमचाच महापौर असे सांगत आहेत. त्यावर गतिमान मिंधे गट बोलायला तयार नसल्याचे यात म्हटलेय.