“…म्हणून मुख्यमंत्रीपदी एक ‘मिंधे’ व उपमुख्यमंत्रीपदी एक ‘होयबा’ अंध भक्त आणून बसवला”

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 07:38 AM2023-03-23T07:38:27+5:302023-03-23T07:39:07+5:30

‘मुंबईचे चांगले ओरबडायचे व सजवलेले ‘खोके’ भरून कचरा पाठवायचा असे मोदी-शहांचे पक्के धोरण,’ ठाकरे गटाचा जोरदार निशाणा.

shiv sena uddhav thackeray group saamna editorial criticize eknath shinde devendra fadnavis over mumbai offices shifted to other place narendra modi amit shah | “…म्हणून मुख्यमंत्रीपदी एक ‘मिंधे’ व उपमुख्यमंत्रीपदी एक ‘होयबा’ अंध भक्त आणून बसवला”

“…म्हणून मुख्यमंत्रीपदी एक ‘मिंधे’ व उपमुख्यमंत्रीपदी एक ‘होयबा’ अंध भक्त आणून बसवला”

googlenewsNext

मुंबईतले वस्त्रोद्योग आयुक्तालय आता दिल्लीला हलवण्यात येत असल्याचे म्हणत विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधण्यात आला होता. दरम्यान, यासंदर्भात राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही प्रश्न विचारण्यात आला होता. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर उत्तर देत आयुक्तालय दिल्लीला हलवण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे म्हटले. या प्रकरणावरून ठाकरे गटानं सरकारवर हल्लाबोल केलाय.

‘द्रौपदीचे वस्त्रहरण व्हावे तसे मुंबईचे वस्त्रहरण रोज सुरू आहे. आता येथील वस्त्रोद्योग आयुक्तालयासही पळवून नेले. मुंबईतून सर्व काही ओरबाडून नेणे व त्यातून मुंबई उद्ध्वस्त करणे हाच डाव आहे आणि म्हणून मुख्यमंत्रीपदी एक ‘मिंधे’ व उपमुख्यमंत्रीपदी एक ‘होयबा’ अंध भक्त आणून बसवला, हे स्पष्ट आहे,’ असे म्हणत ठाकरे गटाने सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर निशाणा साधलाय.

काय म्हटलंय संपादकीयमध्ये?
‘मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा निर्णय मोदी-शहा यांच्या सरकारने घेतला. विरोधकांनी विधानसभेत प्रश्न विचारले तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अंधभक्तास लाजवेल अशी सारवासारव केली. कार्यालय मुंबईतच राहील व वस्त्रोद्योग खात्याचे आयुक्त यापुढे दिल्लीत बसतील. फडणवीस यांचे हे बोलणे फोल आहे. आयुक्तालयाचा अर्थ शेवटी काय असतो? आयुक्तच कार्यालयात नसेल ते कार्यालय व त्यातील शेपाचशे कर्मचाऱ्यांना काय महत्त्व?’ असा सवाल संपादकीयमधून करण्यात आलाय.

ते घातक
'या महाराष्ट्राच्या नुकसानीवर मुख्यमंत्री काही बोलत नाहीत व उपमुख्यमंत्री थातूरमातूर उत्तर देऊन पळ काढतात. विधानसभेत यावर अधिक आक्रमकपणे घेराबंदी करायला हवी होती. तसे घडलेले दिसत नाही. वाघासारख्या महाराष्ट्राची शेळी करून तिच्या शेपटाशी खेळण्याचे तंत्र दिल्लीने सुरू केले आहे,' ते घातक असल्याचे यात म्हटलेय.

मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव
'मुंबईचे चांगले ओरबडायचे व सजवलेले ‘खोके’ भरून कचरा पाठवायचा असे मोदी-शहांचे पक्के धोरण दिसते. देशात जे मुंबईचे महत्त्व आहे, ते कमी करायचे असा विडाच या लोकांनी उचलला आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प आधीच गुजरातला पळवून नेले. मुंबईतील महत्त्वाची कार्यालये हलवली. मुंबई ही यापुढे देशाची आर्थिक राजधानी राहू नये यादृष्टीने मोदी-शहांची पावले पडत आहेत. खरं तर त्यांचा मुंबईच गुजरातला नेऊन जोडायचा डाव होता व आहे. निदान पक्षी मुंबई केंद्रशासित राज्य करून टाकायचे, महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्कच तोडायचा हे त्यांचे धोरण आहे, पण पाच-पन्नास खोकेवाल्यांनी माती खाल्ली असली तरी मराठी जनता वाघासारखी उसळून झेप घेईल या भीतीने ते पाठीमागून वार करत आहेत,' असा आरोपही त्यांनी केला.

Web Title: shiv sena uddhav thackeray group saamna editorial criticize eknath shinde devendra fadnavis over mumbai offices shifted to other place narendra modi amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.