ठाकरेंशी एकनिष्ठ असलेले शिवसेना खा. राजन विचारेंचे व्याही शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 11:38 AM2022-08-09T11:38:11+5:302022-08-09T11:39:15+5:30
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या ४० आमदारांनी साथ दिली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र निर्माण झाले
मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज पार पडत आहे. राजभवनच्या दरबार हॉल इथं नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. या विस्तारात भाजपाचे ९ आणि शिंदे गटातील ९ जणांना संधी देण्यात आली आहे. शिंदे गटातून उदय सामंत, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, दादा भुसे, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या ४० आमदारांनी साथ दिली. त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र निर्माण झाले. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असा गट निर्माण झाला. शिंदे गटाच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारातउद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ असलेले खासदार राजन विचारे यांचे व्याही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी दादा भुसे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
कोण आहेत दादा भुसे?
जाणता राजा मंडळाच्या माध्यमातून दादा भुसे यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. धर्मवीर आनंद दिघेंच्या कार्यातून प्रेरणा घेत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. २००४- मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून विजयी झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २००४, २००९, २०१४ व २०१९ सलग चार पंचवार्षिक मालेगाव बाह्य मतदारसंघातून ते विजयी होत आहेत. २०१४- ला शिवसेना भाजपा युती सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री, सहकार राज्यमंत्रीपद भूषविले. २०१९ ला महाविकास आघाडी सरकारमध्ये अडीच वर्षे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्रीपद सांभाळले. २०२२ रोजी एकनाथ शिंदे बंडानंतर शिंदे गटात ते सामील झाले.
दादा भुसे आणि राजन विचारे व्याही
मागील वर्षी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या कन्येचं तत्कालीन कृषीमंत्री दादा भूसे यांच्या मुलासोबत विवाह सोहळा संपन्न झाला होता. या विवाह सोहळ्याला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनीही लग्न सोहळ्याला हजेरी लावून दोन्ही नवदाम्पत्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. दादा भूसे यांचा मुलगा अविष्कार आणि राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह मागच्या वर्षी झाला आहे.