दिल्ली काबीज करण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार, उद्धव ठाकरेंचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2022 08:38 PM2022-01-23T20:38:20+5:302022-01-23T20:38:40+5:30
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी साधला शिवसैनिकांशी संवाद.
"अनेक दिवसांनी आपण समोर आलो आहोत. फेब्रुवारीत आपण सर्वजण एकत्र भेटलो होतो. सर्वकाही ठरलं आणि कोरोनाची दुसरी लाट आली. आताही दिवाळीच्या सुमारास राज्यभर फिरण्याचा विचार करत होतो, परंतु मानेचं दुखणं आलं आणि शस्त्रक्रिया करावी लागली. त्यातून आता बाहेर आलो आहे. सर्वांच्या प्रेमामुळे आणि शुभेच्छांमुळे यातून बाहेर आलो. परंतु त्यानंतर आता कोरोनाची तिसरी लाट आली. लाटांमागून कोरोनाच्या लाटा येतायत तर शिवसेनेची लाट का आणू शकत नाही. जर एखदा विषाणू एकामागून एक लाटा आणू शकत असेल तर आपल्याकडे प्रचंड तेजस्वी भगव्याचा वारसा आहे," असं मत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांशी संवाद साधताना यावर भाष्य केलं.
"आपल्याकडे मोठा वारसा आहे. दिल्लीत शिवसेना प्रमुखांचा पुतळा उभारण्याचं काम आपण करुच. पण दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दाखवलं ते आपण पूर्ण करणार आहोत की नाही? ते जर आपण करणार असू तर या सर्वाला अर्थ आहे, अन्यथा सर्व निरर्थक आहे," असंही उद्धव ठाकरे म्हणाले. प्रमोद नवलकर यांचाही आज जन्मदिवस आहे. शिवसेना प्रमुखांचे जे साथी सोबती ज्यांनी खांद्याला खांदा लावून महाराष्ट्र पिंजून काढला, शिवसेनेची बीजं रोवली आणि त्या बीजाचं झालेलं महावृक्षात रुपांतर, त्याला आलेली फळ, ती आपण आज चाखत आहोत, असंही ते म्हणाले.
"अनेक दिवसांनी आज तुमच्या समोर आलो आहे. उपचारानंतर काही दिवस त्यात गेले. लवकरात लवकर मी बाहेर पडेन आणि महाराष्ट्र पिंजून काढणार. जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेतलायत. त्या काळजीवाहू विरोधकांना मी भगव्याचं तेज दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं, तसं हे काळजीवाहू विरोधक आहेत. स्वत:च स्वत:च्या काळजीनं त्यांचा अंत होणार आहे. हे एकेकाळी आमचे मित्र होते. आपण त्यांना पोसले. युतीमध्ये २५ वर्षे सडली हे माझं मत आजही कायम आहे. शिवसेना प्रमुख म्हणायचे, राजकारण म्हणजे गजकरण आहे, जेवढं खाजवावं तेवढी खाज आहे. हे राजकारणातले गजकरणी आहेत. ते राजकारण म्हणून काहीही खाजवतायत," असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.