वक्फ बोर्ड विधेयकावर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; "कुठल्याही धर्माच्या जमिनीवर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 02:31 PM2024-08-16T14:31:40+5:302024-08-16T14:33:48+5:30
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून भूमिका मांडताना उद्धव ठाकरेंनी हिंदू मंदिरांच्या जागा किती राजकारण्यांनी ढापल्या त्याची यादी आणावी असं विधान केले आहे.
मुंबई - आज तुमच्याकडे बहुमत असताना वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्याचं नाटक तुम्ही का केले? शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते, कारण मी स्वत: दिल्लीत होतो. सर्व खासदार माझ्यासोबत होते. विधेयकावर चर्चा करायचं ठरवलं असतं तर माझे खासदार विधेयकावर काय बोलायचे असते ते बोलले असते. वक्फ बोर्ड बाजूला ठेवा, माझ्या मंदिराची जमीन चोरली जात असेल आणि तिथे तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर वक्फ असो, हिंदू संस्थान असो वा कुठल्याही धर्माच्या जागा असतील आम्ही वेडवाकडे त्यावर काही होऊ देणार नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून केंद्र सरकारवर आगपाखड केली.
मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनीभाजपावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले की, सेक्युलर नागरी संहिता हे मोदी बोलले म्हणजे त्यांनी हिंदुत्व सोडलं? हिंदुत्व न मानणाऱ्या चंद्राबाबू नायडू, नितीश कुमारांसोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसला मग तुम्ही हिंदुत्व सोडलं नाही? मग उगाच आपल्यामध्ये आग लावण्यासाठी तुम्ही वक्फ बोर्डाचे बिल का आणले? आणलं ते आणलं, तुमच्याकडे बहुमत होतं मग विधेयक मंजूर करून दाखवण्याची हिंमत का दाखवली नाही. नोटबंदी तुम्ही आम्हाला विचारून केली का, तरीही आम्ही सगळे तुमच्यासोबत होतो. सगळ्या कॅबिनेटला बंद करून नोटबंदीची घोषणा केली. मग या विधेयकावर बहुमत असताना विधेयक मांडण्याचे नाटक का केले? असा सवाल त्यांनी विचारला.
त्याशिवाय मंदिराची जमीन किती राजकारण्यांनी ढापली त्याची यादी काढा, मराठवाड्यात किती तो प्रश्न धसास लावा. बीडमध्ये खटला सुरू आहे. अयोध्येत कारसेवकांनी बलिदान केले ते कुणासाठी केले, लोढासाठी केले. अदानीसाठी केले, रामदेवबाबासाठी केले की श्रीश्री रविशंकर यांच्यासाठी केले. किती तरी लाखो कारसेवक गेले, बलिदान केले त्यामुळे राम मंदिर उभं राहिले. जे मंदिर बांधले तेसुद्धा गळके. आमच्या हातात घंटा, अयोध्येतील जमीन किती दराने विकत घेतली आणि कुणाला दिली यावरही जेपीसी लावा. हा विषय वक्फ बोर्डाचा नाही तर आमच्या मंदिराचासुद्धा आहे. केदारनाथ मंदिराचे २००-२५० किलो सोने गायब केले ते कुणी चोरले त्याची चौकशी लावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, मोदींची गॅरंटी चालत नाही म्हणून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी हे प्रश्न विचारत असाल तर इथली जनता दुधखुळी नाही. तुम्ही म्हणाल ते ऐकाल. आजच निवडणूक घेऊन दाखवा. वक्फ बोर्डाचे जसं बिल आणलं महाराष्ट्रात समाजासमाजात जी तुम्ही आग लावली आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा हक्क राज्य सरकारला नाही. बिहारनं वाढवलेली मर्यादा कोर्टाने धुडकावून लावली. हा अधिकार फक्त लोकसभेचा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा अहवाल घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवू शकतात. मराठा आरक्षणाचं विधेयक लोकसभेत आणा. ओबीसींचे आरक्षण तसेच ठेवा. धनगरांनाही आरक्षण द्या. महाविकास आघाडी त्याला पाठिंबा देईल. धर्माधर्मात आगी, हिंदूंमध्ये आगी, मराठी माणसांमध्ये आगी लावून ठेवायच्या या आगीवर होळी पेटवून तुम्ही पोळ्या भाजता म्हणून या आगीत तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.