Sanjay Raut: “भाजपने २ पर्याय दिले होते, वर्षभरासाठी तुरुंगात जाण्याची संजय राऊतांची मानसिकता होती?”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 09:15 AM2022-08-01T09:15:42+5:302022-08-01T09:16:55+5:30
Sanjay Raut: ताठ मानेने शिवसेनेचा बाणा दाखवून देणाऱ्या संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे, असे शिवसेना आमदाराने म्हटले आहे.
Maharashtra Political Crisis: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. यानंतर आता एका बड्या आमदाराने केलेल्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाल्याचे सांगितले जात आहे. भाजपने संजय राऊत यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले होते. संजय राऊत यांची वर्षभरासाठी तुरुंगात जाण्याची राऊतांची मानसिकता होती, असा मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.
शिवसेना पक्षातील अभूतपूर्व बंडाळीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले सिंधुदुर्गातील आमदार वैभव नाईक यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. संजय राऊत आठ दिवसांपूर्वी भेटले होते. वर्षभर मी नसेन. माझे जे काम आहे, त्यात तुम्हाला मदत करावी लागेल. शिवसेना वाढवावी लागेल, त्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. वर्षभरानंतर पुन्हा येईन, असे राऊत म्हणाले होते. त्यांनी ती मानसिक तयारीच केली होती. म्हणूनच ते तडफेने भाजपवर बोलत आहेत, भाजपच्या चुकीच्या धोरणांवर बोलत होते. त्यावरून आपल्याला अटक होणार हे त्यांना माहिती होते, असे वैभव नाईक यांनी सांगितले आहे.
संजय राऊतांना आधीच कल्पना होती
ईडी अटक करणार असल्याचे संजय राऊतांना आधीच कल्पना होती. भाजपने राऊतांना शरण येण्यास सांगितले होते. तुम्हाला जेल हवेय की, भाजप असे दोन पर्याय त्यांच्या पुढे ठेवले होते. मात्र त्यांनी ताठ मानेने शिवसेनेचा बाणा दाखवून आम्ही जेलमध्ये जाण्यास तयार आहोत. मात्र भाजप समोर झुकणार नाही असे सांगितले असल्याचा गौप्यस्फोट आमदार वैभव नाईक यांनी केला.
तुम्हाला अटक करायची आहे, हे वरूनच आदेश आहेत
गेले वर्ष दीड वर्ष ईडीकडून राऊतांना सातत्याने चौकशीला बोलावले जात होते. ते चौकशीला गेले. पण चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांना प्रश्नच विचारला नाही. उलट त्यांना सांगितले तुम्हाला अटक करायची आहे, हे वरूनच आदेश आहेत, असा दावा करतानाच काहीही झाले तरी आम्ही राऊतांच्या पाठी ठामपणे उभे आहोत, असे वैभव नाईक यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, भाजपकडून देशभरात विरोधकांच्या मागे चौकशा लावून त्यांना अटक करत आहे. जेलमध्ये जा किंवा भाजपमध्ये या, असे धोरणच भाजपने अवलंबले आहे, असा गंभीर आरोप करत, सत्तांतराच्या काळात अनेक आमदार ईडीच्या रडारवर होते. त्यांच्या चौकशा सुरू झाल्या. त्या थांबण्यासाठी ते भाजपमध्ये गेले आहेत. मात्र संजय राऊत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. शिवसेनेसोबत राहिले. त्यामुळे संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.