“आघाडीत आलंच पाहिजे असं नाही, कुणाला कसलेही बंधन नाही”; शिवसेनेचे जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 08:24 PM2021-12-11T20:24:59+5:302021-12-11T20:26:00+5:30
भाजप आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील अंतर पाहिलेले नाही, असा टोला लगावण्यात आला आहे.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद आणि धुसपूस चव्हाट्यावर येताना पाहायला मिळत आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीला सर्व मार्ग खुले असून, भाजप फारसा दूर नाही, असे वक्तव्य केले होते. जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर प्रतिक्रिया यायला लागल्या असून, आघाडीत यायला पाहिजे, असे काही नाही. कुणावर कसलेही बंधन नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.
शिवसेना खासदार विनायक राऊत यांना जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या विधानासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेली बोलताना विनायक राऊत म्हणाले की, आघाडी केली म्हणजे सर्वांनी शंभर टक्के आघाडीत आलेच पाहिजे, असे काही नाही. कुणालाही कसलेही बंधन नाही, असा पलटवार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड हे अभ्यासू आणि सुज्ञ नेते
जितेंद्र आव्हाड हे अभ्यासू आणि सुज्ञ नेते आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वच निवडणूका लढवल्या पाहिजेत, या विचाराचे ते आहेत. मात्र, कुठे काही वैचारिक मतभेद किंवा गॅपिंग असेल तर ती नक्कीच दूर केली जाईल. परंतु कोणत्याही परिस्थितीत मोठ्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवल्या जाव्यात असे सर्वांचे मत आहे, असे विनायक राऊत यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष हे स्वतंत्र
महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष हे स्वतंत्र आहेत. त्यांना कोणी बंधन केलेले नाही. मात्र, प्रत्येक जण परिस्थितीनुसार युती-महायूती करतील आणि भविष्यातील निवडणुका लढवतील. कोणावर बंधने नाहीत. सत्ता स्थापन झाली म्हणजे शंभर टक्के महाविकास आघाडीत आलेच पाहिजे असे बंधन नाही, परंतु एक संकेत आहेत. सर्वांना वाटते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूका झाल्या तर चांगले होईल, असे सांगतानाच भाजप आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील अंतर मी पाहिलेले नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, काही विघ्न संतुष्ट मंडळी या दुधात मीठाचा खडा टाकण्याचे काम करीत आहेत. आपला वैचारीक शत्रु हा भाजप असल्याने त्यांना पराभूत करण्यासाठी आपल्याला दोन पावले मागे आले तरी चालणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.