हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये घमासान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 06:23 AM2022-04-11T06:23:19+5:302022-04-11T06:23:40+5:30

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली. तशी छुपी युती आम्ही करीत नाही.

Shiv Sena vs BJP on the issue of Hindutva | हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये घमासान

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजपमध्ये घमासान

Next

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघात भाजपने काँग्रेसला छुपी मदत केली. तशी छुपी युती आम्ही करीत नाही. शिवसेना समोरून वार करते, पाठीत वार करणारी आमची औलाद नाही. हिंदुत्वाचे पेटंट भाजपनेच घेतले आहे का, अशी रोखठोक विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. भाजपने नकली भगव्याचा बुरखा पांघरला असून, तो या निवडणुकीत फाटल्याशिवाय राहणार नाही, असेही ठाकरे यांनी बजावले.

आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारार्थ ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. ते म्हणाले, आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणजे हिंदुत्व सोडलेले नाही. तुम्ही काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तींसोबत सरकारमध्ये गेला. तेव्हा हिंदुत्व कोठे गेले होते? भाजपने बनावट हिंदुहृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला; मात्र जनतेने तो झिडकारला.

भगव्याची ॲलर्जी असणाऱ्यांना पाठबळ, हे कसले हिंदुत्व? फडणवीसांचा प्रतिप्रश्न

ज्यांना हिंदू समाजाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याची ॲलर्जी आहे, त्यांना पाठबळ देणे हे कसले हिंदुत्व, अशी विचारणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात केली. तुम्हाला जर मशिदीवरील भोंगे चालत असतील, तर मग हनुमान चालिसा म्हटले तर राग का येतो, असा सवालही त्यांनी केला.

कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शनिवारी जाहीर सभा घेत रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, भगव्याचे रक्षणासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. ज्यांनी राम मंदिराला विरोध केला, त्यांच्याविरोधात ही लढाई आहे. ३७० कलम रद्द केल्यानंतर रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा दिल्यानंतरही मोदी नावाच्या वाघाने कलम रद्द केले; पण कुणाच्या बापाची विरोध करण्याची हिंमत झाली नाही. रक्ताचे पाट राहू दे, आता काश्मीरमध्ये तिरंगा लहरतोय. हे आहे हिंदुत्व.
 

Web Title: Shiv Sena vs BJP on the issue of Hindutva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.