Shiv Sena vs. Navneet Rana at Matoshree: नव्या अंकाला सुरुवात! राणा दांम्पत्य घरातच अडकले; शिवसेनेकडून मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 04:12 PM2022-04-23T16:12:07+5:302022-04-23T16:15:14+5:30
Navneet Rana Stuck at home : ज्यांना हनुमान चालिसा वाचायची आहे त्यांनी घरात वाचावे. आम्ही उद्या जाऊन त्यांच्या घरात वाचले तर, आता सगळे शिवसैनिक त्यांच्या घराबाहेर उभे आहेत. राणांनी त्यास परवानगी द्यावी, असे अनिल परब म्हणाले.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचण्याचे आंदोलन करणार असल्याचे आव्हान दिले होते. मात्र, शिवसैनिकांनी त्यांना घरातच नजरकैद केले होते. पोलीसही मोठ्या प्रमाणावर बंदोबस्तावर होते. आता राणा दांम्पत्य दिल्लीला निघून जाण्याच्या तयारीत असताना राज्याचे मंत्री अनिल परब यांनी राणा दांम्पत्याला मोठा इशारा दिला आहे.
ज्यांना हनुमान चालिसा वाचायची आहे त्यांनी घरात वाचावे. आम्ही उद्या जाऊन त्यांच्या घरात वाचले तर, आता सगळे शिवसैनिक त्यांच्या घराबाहेर उभे आहेत. राणांनी त्यास परवानगी द्यावी. या राणा दांम्पत्याने मुंबईतील कायदा सुव्यवस्था आणि वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला आहे. आता जोवर ते याची माफी मागत नाहीत तोवर त्यांना शिवसैनिक घराबाहेर पडू देणार नाहीत, असा इशारा परब यांनी दिला.
राज्यातील कायदा व्यवस्था कशी बिघडलेली आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा मुख्यमंत्र्यांविरोधात, शिवसैनिकांविरोधात वक्तव्ये करत आहेत. याद्वारे ते इथले वातावरण कसे चिघळलेले आहे ते दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. याविरोधात आम्ही पोलिसांत तक्रार देणार आहोत. पोलिसांनी त्यांच्यावर उचित कारवाई करावी. एवढे दिवस वातावरण चिघळवून आता ते उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचे कारण सांगून आंदोलन मागे घेतल्याचे सांगत आहेत. हे ढोंग आहे, असे परब म्हणाले. जोवर ते माफी मागणार नाहीत तोवर शिवसैनिक त्यांच्या घराबाहेरून हलणार नाहीत, असे ते म्हणाले.