Maharashtra Election 2024: ठाकरे विरुद्ध शिंदे... विदर्भात कोणत्या शिवसेनेची डरकाळी? समजून घ्या गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 03:38 PM2024-11-10T15:38:45+5:302024-11-10T15:39:50+5:30

Maharashtra Assembly election 2024: विधानसभा निवडणुकीत विदर्भातील मतदारसंघातील निकाल महत्त्वाचे ठरणार आहेत. विदर्भात काही जागांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेंची शिवसेना आमने-सामने आहे.  

Shiv Sena vs Shiv Sena UBT Which Shiv Sena is ahead in Vidarbha in maharashtra election 2024 | Maharashtra Election 2024: ठाकरे विरुद्ध शिंदे... विदर्भात कोणत्या शिवसेनेची डरकाळी? समजून घ्या गणित

Maharashtra Election 2024: ठाकरे विरुद्ध शिंदे... विदर्भात कोणत्या शिवसेनेची डरकाळी? समजून घ्या गणित

राजेश शेगोकार, नागपूर 
Maharashtra Election 2024: टायगर कॅपिटल असे बिरुद मिरविणाऱ्या विदर्भात दोन्ही शिवसेनेचे वाघ विधानसभेच्या आखाड्यात डरकाळ्या फोडत आहेत. एकसंध शिवसेनेने गेल्या वेळी विदर्भात १२ जागा लढवल्या होत्या. यावेळी मात्र दोन्ही शिवसेना प्रत्येकी नऊ जागा लढवत आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेनेला जागावाटपाच्या लढाईतच क्षीण झालेला आवाज निकालात वाढविण्याचे आव्हान आहे.

तीन ठिकाणी शिंदेसेना-काँग्रेस सामना

शिंदे शिवसेनेने रिसोडमध्ये विधान परिषद सदस्या व माजी खासदार भावना गवळी यांना काँग्रेसच्या अमित झनक यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. येथे भाजपाचे अनंतराव देशमुख यांची बंडखोरी आहे. भंडाऱ्यात अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांची लढत काँग्रेसच्या पूजा ठवकर यांच्या विरोधात तर दिग्रसमध्ये शिंदेसेनेचे संजय राठोड व माणिकराव ठाकरे हे आजी-माजी मंत्री वीस वर्षांनंतर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

तीन जागांवर शिवसेना (ठाकरे) विरुद्ध भाजप

अकोला पूर्व, वाशिम व वणी या तीन मतदारसंघांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा थेट भाजपशी सामना आहे. अकोला पूर्वमध्ये भाजपचे रणधीर सावरकर यांच्या विरोधात जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आहेत. वंचित बहुजन आघाडीमुळे तिरंगी लढत आहे.

वंचित बहुजन आघाडीमुळे तिरंगी लढत आहे. वाशिममध्ये उद्धवसेनेने डॉ. सिद्धार्थ देवळे विरुद्ध भाजपचे श्याम खोडे लढत आहेत. वणी मतदारसंघात उद्धवसेनेचे संजय दरेकर तिरंगी लढतीत अडकले आहेत.

बडनेऱ्यात बंड, सिंदेखडराजामध्ये दोन्ही पवारांशी सामना

सिंदखेडराजा मतदारसंघात शरद पवार गटाचे डॉ. राजेंद्र शिंगणे विरुद्ध शिंदेसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर असा सामना होत असून, येथे अजित पवार गटाने मनोज कायंदे यांना उमेदवारी दिली आहे. बडनेऱ्यात युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा यांच्याशी उद्धवसेनेचे सुनील खराटे यांचा सामना असून, येथे प्रीती बंड यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.

रामटेकः शिंदेची प्रतिष्ठा व ठाकरेंच्या अस्तित्वाचा गड...

महायुतीमध्ये शिंदेसेनेने रामटेकवर दावा ठोकला. अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी दिली अन् भाजपमध्ये मोठा वाद झाला. आता हा वाद शमला असला तरी धग कायम आहे. ही जागा शिंदेसेनेसाठी आता प्रतिष्ठेची झाली आहे. 

महाविकास आघाडीत हा मतदारसंघ मिळविण्यासाठी काँग्रेस व उद्धवसेनेत जोरदार रस्सीखेच झाली अखेर उद्धवसेनेने विशाल बरबटे यांना रिंगणात उरविले. मात्र काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करीत येथील लढतीत तिसरा रंग भरला. पूर्व विदर्भात ठाकरेंचा एकमेव शिलेदार या रामटेकच्या गडावर आहे. त्यामुळे येथील निकाल उद्धवसेनेच्या पूर्व विदर्भातील अस्तित्वाचा निकाल असेल.

बाळापूर, बुलढाण्यात उमेदवारांची आयात...

बाळापूरमध्ये उद्धवसेनेचे विदर्भातील एकमेव आमदार नितीन देशमुखांच्या विरोधात शिंदेसेनेने मूळ भाजपचे बळीराम सिरस्कार, तर बुलढाण्यात उद्धवसेनेने काँग्रेसच्या जयश्री शेळके यांना रिंगणात उतरविले आहे.

Web Title: Shiv Sena vs Shiv Sena UBT Which Shiv Sena is ahead in Vidarbha in maharashtra election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.