उपमुख्यमंत्रीपदासह शिवसेनेला हवी १० मंत्रीपदं
By admin | Published: November 1, 2014 11:24 AM2014-11-01T11:24:05+5:302014-11-01T22:03:24+5:30
शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदासह दहा मंत्रीपदांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - वानखेडे स्टेडियमवर मुख्यमंत्र्यांचा शानदार शपथविधी पार पडल्यानंतर आता सर्व मंत्री कामाला लागले असून पाठिंब्याबद्दल शिवसेना-भाजपामध्ये चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यामार्फत दोन्ही पक्षांत मंत्रिपद आणि खातेवाटपावरुन चर्चा सुरू झाली असून शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदासह दहा मंत्रीपदांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नव्या मंत्रिमंडळात एकूण ३२ मंत्र्यांपैकी २० मंत्री भाजपाचे असतील आणि शिवसेनेला १० व मित्रपक्षांना २ मंत्रीपदे देण्याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याचे समजते. मात्र सेनेला १० मंत्रीपदांसह उपमुख्यमंत्रीपदही हवे असून त्यावरच सध्या तोडगा काढण्यात येत आहे.
तत्पूर्वी सन्मान मिळत नसल्याने भाजपाप्रणित सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकणा-या शिवसेनेने नरमाईची भूमिका घेत उद्धव ठाकरेंनी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती. दरम्यान त्यानंतर उद्धव ठाकरे व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यात वानखेडे स्टेडियममध्ये बैठकही झाली, ज्यात शिवसेनेच्या पाठिंब्याविषयीही चर्चा झाली.