शिवसेनेने बजावला ५५ आमदारांना व्हिप; ठाकरे गटाच्या आमदारांनाही आदेश लागू?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 07:24 AM2023-02-27T07:24:54+5:302023-02-27T07:25:17+5:30
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे शिवसेनेच्या चाळीस आमदारांची रविवारी बैठक झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही शिवसेनेकडून सर्वच्या सर्व ५५ आमदारांना सोमवारपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनासाठी व्हिप बजावण्यात आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंदर्भातला हा व्हिप असून, ठाकरे गटाच्या आमदारांनाही हा व्हिप लागू होणार आहे. पुढील दोन आठवडे या संदर्भात कोणतीही कारवाई करणार नाही, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथे शिवसेनेच्या चाळीस आमदारांची रविवारी बैठक झाली. त्यात अर्थसंकल्पातील रणनीतीवर चर्चा झाली. शिवसेनेच्या आमदारांना व्हीप बजावण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिवेशनाला उपस्थित राहावे, यासाठी हा व्हिप असून, जरी कोणी त्याचा भंग केला, तरी त्या आमदार विरोधात कारवाई केली जाणार नाही, असे गोगावले यांनी सांगितले.
शिंदे गटाकडे ४० आणि ठाकरे गटाकडे १५ असे शिवसेनेचे विधानसभेत ५५ आमदार आहेत. व्हिप कोणी कोणावर बजावावा, हा शिवसेनेत वादाचा मुद्दा बनला आहे. या संदर्भातली सुनावणी सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे पुढचे दोन आठवडे कोणीही म्हणजे शिंदे आणि ठाकरे गटाने व्हिप बजावू नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत.