अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद न दिल्यास शिवसेना युती तोडणार, रामदास कदम यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 04:43 PM2019-02-20T16:43:51+5:302019-02-20T16:44:04+5:30
साडेचार वर्षे एकमेकांवर कठोर शब्दांत टीका केल्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात अखेर लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली आहे. मात्र दोन्ही पक्षांमध्ये नव्याने झालेल्या युतीला काही तास उलटत नाहीत तोच दोन्ही पक्षांमध्ये वादाचे फटाके फुटू लागले आहेत.
मुंबई - साडेचार वर्षे एकमेकांवर कठोर शब्दांत टीका केल्यानंतर शिवसेना आणि भाजपा यांच्यात अखेर लोकसभा निवडणुकीपूर्वी युती झाली आहे. मात्र दोन्ही पक्षांमध्ये नव्याने झालेल्या युतीला काही तास उलटत नाहीत तोच दोन्ही पक्षांमध्ये वादाचे फटाके फुटू लागले आहेत. युतीची घोषणा करताना जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झाला नव्हता. दरम्यान, युती करताना शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचे निश्चित झाले असून, शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद न मिळाल्यास शिवसेना युती तोडेल, असा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी दिला आहे.
युतीची घोषणा आणि मुख्यमंत्रिपदाबाबत बोलताना रामदास कदम म्हणाले की, ''शिवसेना आणि भाजपामधील युती ही शिवसेनेने घातलेल्या अटींवरच झाली आहे. तसेच शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचेही ठरले आहे. आता तसे न झाल्यास शिवसेना युती तोडण्याचा निर्णय घेऊ शकेल,''
नाणार प्रकल्प रद्द करण्यापासून विविध मुद्यांवर भाजपाला झुकवत शिवसेनेने अखेर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपासोबत युती केली. भाजपाध्यक्ष अमित शहा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चर्चेत युतीचा निर्णय झाला. त्यानुसार लोकसभेसाठी भाजपा 25 तर शिवसेना 23 जागा लढेल, असे ठरले. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पक्षांसमवेत दिली. तसेच विधानसभेत दोन्ही पक्ष समसमान जागा लढवणार आहेत. मात्र असे असले तरी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.