शिवसेना २०१९ मध्ये स्वबळावर लढणार , उद्धव ठाकरेंची घोषणा; यापुढे भाजपाशी युती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 04:11 AM2018-01-24T04:11:33+5:302018-01-24T04:12:30+5:30
राज्य आणि केंद्रातील सत्तेतून बाहेर पडण्याचा सातत्याने इशारा देणा-या शिवसेनेने तूर्त सत्तेत राहण्यास पसंती दिली आहे. मात्र, २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्य आणि केंद्रातील सत्तेतून बाहेर पडण्याचा सातत्याने इशारा देणा-या शिवसेनेने तूर्त सत्तेत राहण्यास पसंती दिली आहे. मात्र, २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा ठराव आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या
बैठकीत करण्यात आला. याच बैठकीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी फेरनिवड करण्यात आली, तर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना नेतेपदी बढती देण्यात आली.
एनएससीआयच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत स्वबळावर लढण्याचा ठराव शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी मांडला. खा.अनिल देसाई यांनी त्यास अनुमोदन दिले. आम्ही स्वबळावर लढून महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ पैकी २५ तर विधानसभेच्या २८८ पैकी १५० जागा जिंकू आणि राज्यात स्वबळावर सत्ता मिळवू, असा निर्धार या ठरावाद्वारे करण्यात आला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने भाजपाशी युती केली होती. आम्ही इतकी वर्षे संयम बाळगून त्यांच्यासोबत राहिलो, पण आज हाच पक्ष शिवसेनेचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न करीत असून, त्यासाठी सत्तेचा गैरवापर करीत असल्याची टीका ठरावात करण्यात आली. पक्षप्रमुख पदाची सूत्रे पुन्हा स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात उद्धव यांनी भाजपाचे हिंदुत्व बेगडी असल्याची टीका केली. ते म्हणाले की, दहशतवाद्यांना भाऊ मानणाºया पीडीपीसोबत काश्मिरात सत्ता भोगणाºया भाजपाचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. स्वबळावर लढणे हा गुन्हा नाही. शिवसेनाप्रमुख हयात असताना प्रमोद महाजन यांनी शतप्रतिशत भाजपाची घोषणा केली होती. आता समोर मोदी असोत वा आणखी कोणी विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकविणारच, अशी गर्जना उद्धव यांनी केली.
प्रत्येक राज्यात लढणार-
शिवसेना यापुढे प्रत्येक राज्यात निवडणूक लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. आतापर्यंत हिंदुत्ववादी मतांमध्ये विभाजन होऊ नये, म्हणून आम्ही लढत नव्हतो, पण आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्हालाच लढावे लागेल, असे ते म्हणाले.
पक्ष म्हणून त्यांना अधिकार-
शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही बोललेच पाहिजे असे नाही. त्यांनी त्यांची भूमिका आज मांडली. आम्ही भविष्यात लोकसभा, विधानसभेचा विचार करू, तेव्हा काय ती भूमिका मांडू. पक्ष म्हणून भूमिका घेण्याचा त्यांना अधिकार आहे. - खा.रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
निवडणुकीला आणखी अवधी आहे. सध्या तरी आमची युती आहे. आमचे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. -देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री