मुंब्य्रात शिवसेना विमान घेऊन उडणार

By admin | Published: May 18, 2016 03:02 AM2016-05-18T03:02:55+5:302016-05-18T03:02:55+5:30

विधान परिषद निवडणुकीची धामधुम सुरु असतांनाच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीदेखील शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली

Shiv Sena will fly in Mumbai | मुंब्य्रात शिवसेना विमान घेऊन उडणार

मुंब्य्रात शिवसेना विमान घेऊन उडणार

Next


ठाणे : एकीकडे विधान परिषद निवडणुकीची धामधुम सुरु असतांनाच ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीदेखील शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मागील निवडणुकीत शिवसेना मुंब्य्रातून ज्या धनुष्यबाणामुळे पिछाडीवर पडली होती. तो धनुष्यबाण आता निवडणुकीपुरता भात्यात कोंबून मुंब्य्रातून आगामी निवडणूक विमान चिन्हावर अपक्ष म्हणून लढविण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत.
विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनेची लढत रंगणार आहे. त्यानंतर लगेचच ठाणे पालिका निवडणुकीची तयारी सुरू होईल. यात अधिकाधिक जागांवर कब्जा करण्यासाठी शिवसेनेने आतापासूनच रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवार मागे घेऊन राष्ट्रवादीचे देवराम भोईर यांची बिनविरोध निवड करुन भोईर अ‍ॅण्ड कंपनीला आपल्याकडे वळविण्याचे प्रयत्न केले. त्यात आगामी निवडणुकीत शिवसेना, भाजपा स्वबळावर निवडणुका लढविण्याच्या तयारीत असल्याने शिवसेनेने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यानुसार कमी नगरसेवक निवडून येणाऱ्या मुस्लिमबहुल मुंब्य्रातील विविध प्रभागांवर शिवसेनेने आपली नजर वळविली आहे. गेल्या खेपेला मुंब्य्रातून फारच कमी नगरसेवक शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आल्याने सत्तेसाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यामुळेच या भागांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी शिवसेनेने धनुष्यबाणाचा त्याग करण्याची खेळी खेळण्याचे ठरविले आहे. आपल्याच उमेदवारांना विमान चिन्हाखाली अपक्ष म्हणून उतरविण्याचा हा प्रयत्न आहे. सध्या चार पॅनलचा एक वॉर्ड होण्याच्या हालचालींना वेग आल्याने, कदाचित शिवसेनेची ही शक्कल यशस्वी ठरण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)
मुंब्य्रातील काही शिवसेना समर्थकांनी ही योजना आखली असून ती आता श्रेष्ठींच्या कानावर घातली जाणार आहे. यातून जागा वाढतील, अशी आशा या मंडळींना वाटू लागली आहे. शिवसेनेच्या श्रेष्ठींनीदेखील विधान परिषदेची धामधुम संपल्यानंतर यावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु शिवसेनेची ही खेळी मतदार राजा खरी ठरवणार का? हे मात्र येणारा काळच निश्चित करणार आहे.

Web Title: Shiv Sena will fly in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.