शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, सत्तेत राहून मात्र विरोध करणार- विनायक राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 09:27 PM2017-09-25T21:27:36+5:302017-09-25T21:27:47+5:30
महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व कुठे दिसत नाही. त्यामुळेच शिवसेनेला सत्तेमध्ये राहूनही आंदोलने करावी लागत आहेत. याचा अर्थ सत्तेतून बाहेर पडणार असा होत नाही, असा खुलासा खासदार विनायक राऊत यांनी केला. दसरा मेळाव्यात शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत ही राऊत यांनी दिले ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
सावंतवाडी, दि. 25 - महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे. राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व कुठे दिसत नाही. त्यामुळेच शिवसेनेला सत्तेमध्ये राहूनही आंदोलने करावी लागत आहेत. याचा अर्थ सत्तेतून बाहेर पडणार असा होत नाही, असा खुलासा खासदार विनायक राऊत यांनी केला. दसरा मेळाव्यात शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचे अप्रत्यक्ष संकेत ही राऊत यांनी दिले ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
खासदार राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी गाव पॅनेल आहे, तेथे शिवसेनेचे सहकार्य राहणार आहे. मात्र जेथे स्वबळावर लढण्याचे ठरवण्यात आले आहे तेथे शिवसेना स्वबळावरच निवडणूक लढवेल, असे स्पष्ट केले. आमची लढाई अद्याप कोणाशी ठरली नाही. गावात राणेंच्या समर्थ विकास पॅनेलला कोणीही साथ देणार नाही. तर काँग्रेस पूर्णपणे खिळखिळी झाली आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
नारायण राणे हे आमच्यावर टक्केवारीचे आरोप करतात. त्यांची सवय आम्हाला चांगली माहीत आहे. मी एक महिन्याचा कालावधी देतो. त्यांनी एक तरी ठेकेदार दाखवून द्यावा ज्याच्याकडून आम्ही टक्केवारी घेतो. ठेकेदार कंपनी राणेंचीच आहे. कोणाचे ते त्यांनी प्रतिज्ञापत्र घ्यावे, असे आव्हान यावेळी राऊत यांनी दिले. शिवसेना दसरा मेळाव्यात सत्तेतून बाहेर पडणार का, असे विचारले असता त्यांनी याबाबतचा निर्णय सर्वस्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार असल्याचे स्पष्ट केले.
मात्र, शिवसेना सत्तेमध्ये राहून करत असलेल्या आंदोलनाबाबत विचारले असता सध्या विरोधी पक्ष कुठेच दिसत नाही. त्यामुळे आम्हाला सत्तेमध्ये राहून आंदोलने करावी लागतात. याचा अर्थ सत्तेमधून बाहेर पडणार असा होत नाही. सत्तेमध्ये राहूनही लोकांची कामे होऊ शकतात, मग सत्तेतून बाहेर का पडावे, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. राणे यांच्या भाजपा प्रवेशामुळे शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. राणे आले म्हणून शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, उलट सहा महिन्यात मित्रपक्ष भाजपलाच राणेंना घेतल्याचा पश्चाताप होईल. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणताही त्रास नाही. ते निवांतपणे काम करतात. पण राणे आल्यानंतर त्यांना त्रास देण्यास सुरू करतील. जिल्ह्यातील भाजपचे नेते सध्या चांगले काम करीत आहेत. पण त्यांनाही राणे भाजपात आल्यावर काय ते कळेल त्याची आम्हाला काळजी वाटते, असा उपरोधिक टोलाही राऊत यांनी भाजप नेत्यांना हाणला.