विधानसभेत ‘स्ट्राइक रेट’ वाढेल? काँग्रेसची ‘व्होट बँक’ मदतीला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:36 PM2024-10-17T12:36:55+5:302024-10-17T12:37:20+5:30
उद्धव ठाकरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अँजिओग्राफी झाली, त्यामुळे तब्येतीला काही मर्यादा आल्या तरी त्याची चिंता न करता ते ठाकरी शैलीत विरोधकांचा प्रचारात निश्चितच समाचार घेतील.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत उद्धवसेनेने सर्वाधिक २१ जागा लढविल्या आणि ९ जागा जिंकल्या. मात्र, विधानसभेला यशाचा स्ट्राइक रेट वाढविण्याचे आव्हान या पक्षासमोर असेल. कारण, जितके जास्त यश तितके उद्धव ठाकरे हे मविआ सत्तेत आल्यास मुख्यमंत्रिपदाच्या समीप असतील.
२०१४ ते २०१९ या काळात भाजपसोबत शिवसेना सत्तेत होती. २०१९ मध्ये दोघांची फारकत झाली. भाजपला पर्याय देण्यासाठी निर्माण झालेल्या महाविकास आघाडीचा शिवसेना हा घटक पक्ष बनला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरे मंत्री झाले. सत्तापदे न घेण्याचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासाठी घालून दिलेला पायंडा ‘महाराष्ट्राची, मराठी माणसांची गरज’ असे म्हणत मोडला गेला. आता सत्तेच्या राजकारणात उद्धव ठाकरे पुरते मुरब्बी झाले आहेत.
शिवसेनेचे ‘ठाणेदार’ अशी ओळख असलेल्या एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड केले आणि शिवसेनेत उभी फूट पडली. खरी शिवसेना कोणाकडे यावर अनेक तर्क दिले गेले. पक्षाचे चिन्ह आणि नाव हे शिंदे यांना मिळाले. लोकसभा निवडणुकीत शिंदेंपेक्षा ठाकरेंना दोन जागा जास्तच मिळाल्या. त्यामुळे शिवसेना दोघांमध्ये जवळपास समसमान विभागली गेली असल्याचे चित्र समोर आले. मात्र विधानसभेवर झेंडा फडकविण्यात उद्धव हे मविआच्या साथीने यशस्वी होतात की शिंदे हे महायुतीच्या साथीने यशस्वी होतात यावर शिवसेनेवर अधिपत्य कोणाचे हे ठरेल.
काँग्रेसची ‘व्होट बँक’ मदतीला
उद्धव ठाकरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी अँजिओग्राफी झाली, त्यामुळे तब्येतीला काही मर्यादा आल्या तरी त्याची चिंता न करता ते ठाकरी शैलीत विरोधकांचा प्रचारात निश्चितच समाचार घेतील.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीन पक्षांची मते एकमेकांना मोठ्या प्रमाणात मिळाली, त्यामुळे तिघांनाही फायदा झाला.
खरे तर काँग्रेस आणि शरद पवार गटाची व्होटबँक वेगळ्या विचारांची होती, तरीही त्यांनी उद्धव ठाकरेंना साथ दिली. विधानसभा निवडणुकीत असेच चित्र कायम राहिले तर उद्धव यांना त्याचा नक्कीच फायदा होईल.