'मुलगा शिंदे गटात गेल्याने शिवसेनेवर परिणाम होणार नाही'; सुभाष देसाईंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 08:21 PM2023-03-13T20:21:17+5:302023-03-13T20:22:42+5:30
'माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे.'
मनोहर कुंभेजकर
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पुन्हा एकदा शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे माजी मंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावर आता सुभाष देसाई यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
आपल्या मुलाच्या पक्षप्रवेशावर सुभाष देसाई म्हणाले की, 'माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.'
'शिवसेना, वंदनीय बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढे सुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे,' अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी दिली.
"...म्हणून मी एकनाथ शिंदेंसोबत काम करण्याचा निर्णय घेतला"
शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भूषण देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब हेच माझे दैवत आहेत. महाराष्ट्राचा विकास आणि बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांच्या कामाची पद्धतही माहीत आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला, असं भूषण देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच या निर्णयाबाबत मी वडील सुभाष देसाई यांना माझ्या निर्णयाबद्दल आधीच कल्पना दिली होती, अशी माहिती देखील भूषण देसाई यांनी यावेळी दिली.