शिवसैनिक वारकरी भाविकांच्या कायम पाठीशी- नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 05:27 PM2019-11-24T17:27:12+5:302019-11-24T17:28:51+5:30
शिवसेनेकडून जखमी वारकऱ्यांना मदत
पुणे - पंढरपूरवरुन आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकर्यांच्या दिंडीत पुणे जिल्ह्यातील दिवे घाटात एक जेसीबी घुसून २ वारकरी मृत्युमुखी पडले. तर दोनजण गंभीर जखमी, 22 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेतील मृत आणि जखमींच्या नातेवाईकांच्या पाठिशी शिवसैनिक कायम आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार जखमी वारकर्यांच्या खात्यावर थेट दोन लाख चाळीस हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. जखमींना धनादेश दिला जाईल-दिला जाईल असे म्हणत न बसता शिवसेना तात्काळ मदत करते, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
अपघातात जखमी झालेल्यांना घरी जाण्यासाठी रुग्णवाहिका शिवसेनेच्या वतीने देण्यात यावी. तसेच हडपसर भागात हॉस्पिटलची संख्या जास्त आहे. येथे बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईक यांना राहण्याची हेळसांड होत असते त्यामुळे शिवसेनेच्या वतीने याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून जागा उपलब्ध केली जाईल आणि त्याठिकाणी रुग्णसेवालय उभारण्याची इच्छा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली असता नगरसेवक श्री. नाना भानगिरे यांनी याबाबत लवकरात लवकर कारवाई केली जाईल सांगितले. तसेच जखमी वारकरी रुग्णांची तात्काळ सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी नोबेल हॉस्पिटलचे कौतुक केले.
मागील आठवड्यात पंढरपूरवरुन आळंदीच्या दिशेने निघालेल्या वारकर्यांच्या दिंडीत, पुणे जिल्ह्यातील दिवे घाटात एक जेसीबी घुसून 2 वारकरी मृत्युमुखी पडले. तर 24 जण जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हडपसर येथील नोबल रूग्णालयात जाऊन, जखमी वारकरी भाविकांची आणि त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.
यावेळी नोबल हॉस्पिटलचे अतिदक्षता विभागाचे मुख्य डॉ. खान, संचालक डॉ. पोटे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिग्विजय कांबळे, डॉ. गिरीष भोसले. तालुका हवेली तहसीलदार श्री. सुनील कोळी, नगरसेवक नाना भानगिरे, शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, नगरसेविका प्राची आल्हाट, विजय देशमुख, तानाजी लोणकर, समीर तुपे, शिवसेना महिला शहर संघटक तथा नगरसेविका संगिता ठोसर, प्राची आल्हाट, युवासेना शादाब मुलानी, युवराज शिंगाडे, शिवसेना पदाधिकारी व वारकरी यावेळी अन्य उपस्थित होते.
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मागील कित्येक वर्षापासुन वारकरी भाविकांनी राज्याला एक दिशा देण्याचे काम केले आहे. हे वारकरी भाविक आळंदी ते पंढरपूर दरम्यान वारीमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. या वारीमध्ये आजवर केव्हा गालबोट लागण्याचे काम झाले नाही. मात्र यंदा पंढरपूर वरुन आळंदीच्या दिशेने दिंडी जाताना, एक जेसीबी घुसून निष्पाप वारकरी भाविकांना चिरडले जाते. ही घटना दुःखद घडली असून आता यापुढील काळात अशी घटना घडता कामा नये. त्या दृष्टीने लवकरच अधिकारी वर्गाची बैठक लावून, वारी आणि वर्षभरातील पंढरपूर, आळंदी येथे येणार्या दिंडीमध्ये पोलीस संरक्षण देण्याच निर्णय घेतला जाईल डॉ.गोऱ्हे असे त्यांनी सांगितले.