'हा' खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा; माजी मंत्र्याविरोधात शिवसैनिकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 07:14 PM2020-01-09T19:14:35+5:302020-01-09T19:32:24+5:30
आमदार तानाजी सावंत यांनी मंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.
मुंबई - राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करत उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत थेट भाजपाला मदत केली आहे. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष विराजमान झाला आहे. मात्र तानाजी सावंत यांच्या पक्षविरोधी कृत्यामुळे शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सोलापूरमधील शिवसैनिकांनी पोस्टरबाजी करत हा खेकडा शिवसेना पोखरत आहे. वेळीच नांग्या मोडा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे करण्यात आली आहे. हा बॅनर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या बॅनरवर मात्र कोणी निष्ठावंत शिवसैनिक असा उल्लेख असल्याने नेमके पोस्टर्स कोणी लावले याची स्पष्टता नाही.
सोलापूरातील मेकॅनिक चौकात हा बॅनर लागलेला आहे. यामध्ये तानाजी सावंत यांचा फोटो खेकड्याच्या चित्रावर टाकण्यात आला आहे. सोलापूर आणि धाराशीवची शिवसेना पोखरत आहे. वेळीच नांग्या मोडा असं लिहिण्यात आले आहे. तानाजी सावंत मंत्री असताना कोकणातील तिवरे धरण फुटण्याची घटना घडली होती. त्यावेळी खेकड्यांनी पोखरल्यामुळे धरण फुटले असा अजब दावा त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच मी महाराष्ट्राला भिकेला लावेल, पण मी कधीही भिकारी होणार नाही असं वक्तव्यही सावंत यांनी केलं होतं. त्यावरुनही विरोधकांनी मोठी कोंडी केली होती.
आमदार तानाजी सावंत यांनी मंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. तसेच, आपणास डावलण्याचे कारणही विचारले होते. मात्र, उद्धव ठाकरेंच्या उत्तराने त्यांचं समाधान झालं नाही. त्यामुळे, यापुढे मी मंत्रिपदासाठी कधीही मातोश्रीवर येणार नाही, असे सावंत यांनी म्हटलं होतं. सावंतांचा हा तोरा पाहून उद्धव ठाकरेंनीही ठाकरे शैलीत 'जय महाराष्ट्र' म्हणत त्यांना निरोप दिला होता.
अलीकडेच तानाजी सावंत यांच्या गटाने भाजपला साथ दिल्यामुळे उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना तोंडघशी पडावे लागले. या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या भाजप समर्थक सदस्या अस्मिता कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी सेनेच्या बंडखोर गटाचे धनंजय सावंत यांची वर्णी लागली. यामुळे शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.