युतीमध्ये शिवसेनेची २५ वर्षे सडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 01:04 AM2017-01-28T01:04:54+5:302017-01-28T01:05:17+5:30
युतीमध्ये राहून आमची २५ वर्षे सडली. यापुढे जे काही असेल, ते माझ्या शिवसेनेचे, शिवसैनिकांचे असेल. महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये मी कुठेही युती करणार नाही.
मुंबई : युतीमध्ये राहून आमची २५ वर्षे सडली. यापुढे जे काही असेल, ते माझ्या शिवसेनेचे, शिवसैनिकांचे असेल. महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये मी कुठेही युती करणार नाही. आता लढाई सुरू झाली आहे. आम्ही मुंबई, ठाणे, नाशिक सगळे जिंकणार. यापुढे राज्यात स्वबळावरच भगवा फडकविणार, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या मेळाव्यात जाहीर केले.
देशासाठी, हिंदुत्वासाठी आम्ही तुमचा ‘उदोउदो’ करत बसलो. आम्ही सत्तेचे लोभी नाही, शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही, शिवसेनेला कोणी कमी लेखत असेल, तर मी त्याला जागेवर शिल्लक ठेवणार नाही, माझी तयारी निखाऱ्यावर चालण्याची आहे, तुमची आहे का? मला अस्तनीतील निखारे नकोत. तुम्ही मला वज्रमूठ द्या, दात पाडायचे काम मी करून दाखवतो.
भाजपाने ११४ जागा मागणे, हा शिवसेनेचा अपमान नाही का? असा सवाल करून ठाकरे म्हणाले की, आमची युती झाली, तेव्हा कोणाची हवा होती ते आठवा. २०१२ मध्ये महापालिकेत आपण कामांच्या जोरावर लोकांसमोर गेलो होतो. त्या वेळी तुम्ही विवंचनेत होता, तेव्हा शिवसेनेच्या कामगिरीने तुम्हाला वाचवलं, हे तुम्ही विसरलात?
शिवसैनिक मरमर राबतो आणि मुंबई जिंकतो. त्यानंतर, नगरसेवक वचननामा अंमलात आणतात. मग कशासाठी तुम्हाला जास्त जागा देऊ? आम्ही कधी उपमुख्यमंत्रिपद, चांगली खाती मिळावी असे मागितले का? हे सरकार चालावे, म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत. माझ्या घरामध्ये घुसून माझ्यावर येणार असाल, तर मी तुमची पंचारती करू?, असा हल्लाबोल उद्धव यांनी केला. सुनील प्रभू आणि स्नेहल आंबेकर या दोन आजी-माजी महापौरांचा उद्धव यांनी सत्कार केला. (प्रतिनिधी)