वेगळ्या विदर्भावर भाजपाला घेरण्यासाठी शिवसेनेची काँग्रेसशी युती
By admin | Published: August 2, 2016 03:13 PM2016-08-02T15:13:04+5:302016-08-02T15:13:04+5:30
वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर मित्रपक्ष शिवसेनेनं काँग्रेसशी हातमिळवणी करुन भाजापाची कोंडी करण्याचं ठरवलं असल्याचं दिसतं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 02 - वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर विरोधकांसह मित्रपक्ष शिवसेनेनेदेखील भाजपाला घेरण्यास सुरुवात केली आहे. आणि आता तर मित्रपक्ष शिवसेनेनं काँग्रेसशी हातमिळवणी करुन भाजापाची कोंडी करण्याचं ठरवलं असल्याचं दिसतं आहे. मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करुन चर्चादेखील केली. त्यामुळे शिवसेना आता कोणती नवी खेळी खेळत आहे याकडे भाजपासाह विरोधकांचंही लक्ष लागलं आहे.
फोनवर झालेल्या चर्चेनुसार वेगळा विदर्भ विरुद्ध अखंड महाराष्ट्राच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे मंत्री थेट काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याचं ठरलं होतं. त्यानुसार विधानभवनात रामदास कदम यांच्या दालनात शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांची बैठक सुरु आहे. बैठकीत रामदास कदम, सुभाष देसाई, दिवाकर रावते, एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित आहेत.
वेगळ्या विदर्भाला समर्थन करणा-या भाजपाविरोधात सर्वपक्षीय एकजूट झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आपण अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या निवेदनानंतरही शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम आणि विधीमंडळ गट नेते एकनाथ शिंदे विधानभवनातून थेट मातोश्रीकडे रवाना झाले होते. उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर अखंड महाराष्ट्रासाठी शिवसेनेने रणनीती ठरवली.
वेगळ्या विदर्भावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकी काय भुमिका घ्यावी ? याबाबत गोंधळलेला दिसत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अधिवेशनात भाजपाला वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर धारेवर धरलं असताना केंद्रातील नेते मात्र वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आपण असल्याचं सांगत आहे. यामुळे वेगळ्या विदर्भाऐवजी राष्ट्रवादीचे नेतेच वेगळे झाले असल्याचं दिसत आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तर सरकारला धारेवर धरत जोरदार टीका केली. मात्र ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी आमचा वेगळ्या विदर्भाला विरोध नसल्याचं सांगितलं आहे.