आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न : राष्ट्रवादीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 08:38 PM2019-07-21T20:38:12+5:302019-07-21T20:39:29+5:30
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. त्यासाठी आजपर्यंत शिवसेनेचे कधी धाडस झाले नाही. पण प्रशांत किशोर यांच्या कन्सल्टन्सीचा हा परिणाम आहे.
पुणे : आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. त्यासाठी आजपर्यंत शिवसेनेचे कधी धाडस झाले नाही. पण प्रशांत किशोर यांच्या कन्सल्टन्सीचा हा परिणाम आहे. कन्सल्टन्ट लावून राजकारण करण्याची ही नवी पध्दत महाराष्ट्रात आली आहे. कन्सल्टन्ट सांगेल तसा दौरा करायचा, कार्यक्रमांचे आयोजन करायचे, अशी टाकी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी भाजपा व शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले, भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देवेंद्र फडणवीस असतील, अशी आशा आहे. आणि शिवसेनेचा चेहरा ठाकरे आहेत. पण एका युतीचे दोन चेहरे प्रोजेक्ट झाले आहेत. लोकसभेला २२० मतदारसंघात युती पुढे आहे. असे असताना एकच चेहरा पुढे करायला हवा. याचा अर्थ शिवसेनेला भाजपाचे नेतृत्व मान्य नाही. त्यांचे त्यावर एकमत झालेले नाही. महाराष्ट्रात अजून दोन मुख्यमंत्री पदे निर्माण झाली नाहीत, असा टोला पाटील यांनी लगावला. एकमेकांच्या विरोधात भांडायचे आणि महाराष्ट्रात आम्ही दोघेच आहोत असे चित्र निर्माण करण्याचा भाजपा व शिवसेनेचा प्रयत्न आहे, असे पाटील म्हणाले.
काँग्रेस-राष्ट्रवादीतून माणसे यावीत यासाठी भाजपा प्रयत्न का करतय. याचा अर्थ त्यांना स्वत:वर आत्मविश्वास नाही. आता आम्हाला चिंता भाजपातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची आहे. त्यांच्यावर रोडरोलर फिरायला लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यात अस्वस्थता असल्याने भाजपा व शिवसेनेतील लोक आम्हाला येऊन भेटत आहेत. लोकांसमोर जाताना चेहरा वाचविण्यासाठी शिवसेनेकडून मोर्चाचे नाटक केले जात आहे. पीक विम्यामध्ये काय भेटते हे माहित नसलेल्या मुंबईतील शिवसैनिकांना घेऊन मोर्चा काढला. आम्हीही आता या मुलभुत मुद्यांवर रस्त्यावर उतरणार आहोत.
पुण्यातील घोटाळेबाज आमदार कोण?
पुण्यातील सत्ताधारी पक्षाच्या दोन आमदारांनी करोडो रुपयांचा घोटाळा केल्याची चर्चा आहे. याबाबत पाटील यांना हटकले असता त्यांनीही याबाबत माहिती, कागदपत्रे मिळणार असल्याचे सांगितले. कागदपत्रांचा अभ्यास करून याबाबत लवकर माहिती देऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुण्यातील ते दोन घोटाळेबाज आमदार कोण, याबाबत चर्चेला ऊत आला आहे.