पक्ष आणि धनुष्यबाण टिकवण्यासाठी निवडणूक आयोगासमोर शिवसेनेची मोठी खेळी, शिंदे गटाची होणार कोंडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 12:14 PM2022-10-07T12:14:09+5:302022-10-07T12:14:52+5:30
Shiv Sena News: पक्ष आणि धनुष्यबाणावरील आपली दावेदारी पक्की करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि चिन्हावरील दावा पक्का करण्यासाठी शिवसेनेने केलेल्या या खेळीमुळे शिंदे गटाची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
मुंबई/नवी दिल्ली - शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदार आणि १२ खासदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळवल्यानंतर शिंदे गटाने आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगत शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दावा ठोकला होता. दरम्यान, धनुष्यबाणासाठी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत लढाई सुरू आहे. या लढाईवर आज निवडणूक आयोग निर्णय देणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तो निर्णय आता लांबणीवर पडलाय. त्यातच पक्ष आणि धनुष्यबाणावरील आपली दावेदारी पक्की करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि चिन्हावरील दावा पक्का करण्यासाठी शिवसेनेने केलेल्या या खेळीमुळे शिंदे गटाची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.
पक्ष आणि पक्षचिन्ह याबाबत कागदपत्रे सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आजची मुदत दिली होती. दरम्यान, पक्ष आणि पक्षचिन्ह यावरील आपला दावा पक्का करण्यासाठी शिवसेनेने मोठी खेळी केली आहे. शिवसेना निवडणूक आयोगासमोर १८० सदस्यांचं प्रतिज्ञापत्र सादर करणार आहे. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्यांची प्रतिज्ञापत्रे ही आजच सादर करण्यात येणार आहेत. त्याबरोबरच शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांचीही प्रतिज्ञापत्रही शिवसेनेकडून सादर केली जाणार आहेत. तसेच त्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शिवसेनेकडून निवडणूक आयोगाकडे केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, धनुष्यबाण चिन्हावर आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार नसल्याचे तसेच धनुष्यबाणाबाबतचा निर्णय लांबणीवर पडल्याची माहिती समोर येत आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाण चिन्हावर निर्णय होईल. हे चिन्ह दोन पैकी एका गटाला मिळेल किंवा ते गोठवले जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकला आहे. मात्र दोन्ही गटांना आपापले पुरावे सादर करण्यासाठी आजचीच मुदत देण्यात आलेली आहे. आता आयोगाकडून त्यात वाढ होणार का याकडे दोन्ही गटांचे लक्ष लागले आहे.