मुंबई शिक्षकमध्ये भाजपसमोर शिंदेसेनेचे आव्हान ; शिवाजी शेंडगे पुरस्कृत उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 10:20 AM2024-06-14T10:20:54+5:302024-06-14T10:21:24+5:30
Vidhan Parishad Election 2024: विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार मागे घेतल्यानंतर आता शिंदेसेनेने मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवाजी शेंडगे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घाेषित केले आहे. शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मुंबई शिक्षक मतदारसंघातील पुरस्कृत उमेदवाराविषयी माहिती दिली.
मुंबई - विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवार मागे घेतल्यानंतर आता शिंदेसेनेने मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवाजी शेंडगे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून घाेषित केले आहे. शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मुंबई शिक्षक मतदारसंघातील पुरस्कृत उमेदवाराविषयी माहिती दिली. विधान परिषद निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान होते. त्यामुळे शिंदेसेनेने उमेदवार देणे ही रणनीती आहे की भाजपच्या उमेदवाराला आव्हान असे तर्कवितर्क लढविले जात आहे.
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत शिंदेसेनेने उमेदवार दिले होते. मात्र, भाजपसाठी शिंदेसेनेला मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घ्यावी लागली. खुद्द संजय मोरे यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून आपला अर्ज मागे घेतला, मात्र मोरे यांनी आज मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील शिंदेसेनेच्या उमेदवारांची माहिती दिली. नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी किशोर दराडे यांचे नाव आधीच घोषित केले आहे, तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी आम्ही शिवाजी शेंडगे यांचे नाव पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित करत आहोत, असे मोरे म्हणाले. भाजपने मुंबई शिक्षकमधून शिवनाथ दराडे, उद्धवसेनेने ज. मो. अभ्यंकर, तर अजित पवार गटाने शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय शिक्षक भारती संघटनेने सुभाष मोरे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे.