राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 06:48 AM2019-05-23T06:48:11+5:302019-05-23T06:48:21+5:30
सुभाष देसाई यांची वर्णी लागण्याची शक्यता; संजय राऊत, अनिल देसाई, आनंद अडसूळ आदींची नावे चर्चेत
मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळावे, अशी शिवसेनेची आग्रही मागणी आहे. त्यानुसार राज्याचे उद्योगमंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांना राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देसाई यांच्या नावाला अनुकूलता दर्शवतील, असे समजते.
देसाई यांना या विस्तारात उपमुख्यमंत्रिपद तसेच राष्ट्रवादी काँंग्रेसच्या आमदारकीचा बुधवारी राजीनामा देऊन शिवसेना पक्षात प्रवेश केलेले जयदत्त क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेला काही मंत्रिपदे मिळतील, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या इच्छुक आमदारांनी आतापासूनच मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागण्यासाठी जोरदार तयारी सुरू केल्याचे समजते.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळण्याबाबत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या मंत्रिपदाबाबत मोदी, अमित शहा व उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. मोदी यांच्या नव्या संभाव्य मंत्रिमंडळात शिवसेनेतर्फे खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, आनंद अडसूळ, चंद्रकांत खैरे, विनायक राऊत व गजानन कीर्तिकर यांची नावे चर्चेत असल्याचे समजते.