नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची दुटप्पी भूमिका - राधाकृष्ण विखे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 10:51 PM2019-01-21T22:51:30+5:302019-01-21T22:52:07+5:30
शिवसेनेची नाणारबाबत दुटप्पी भूमिका आहे. पण जनता यात फसणार नाही. काँग्रेस नेहमीच स्थानिकांच्या बाजूने राहिली आहे आणि यापुढेही राहील. जनतेला प्रकल्प नको असेल तर काँग्रेसलाही नको, असे मत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी : शिवसेनेची नाणारबाबत दुटप्पी भूमिका आहे. पण जनता यात फसणार नाही. काँग्रेस नेहमीच स्थानिकांच्या बाजूने राहिली आहे आणि यापुढेही राहील. जनतेला प्रकल्प नको असेल तर काँग्रेसलाही नको, असे मत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.
काँग्रेसच्या कोकण जनसंपर्क यात्रेचा शेवटचा टप्पा सावंतवाडीतून सुरू झाला असून, त्या निमित्ताने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे सोमवारी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांनी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार हुसेन दलवाई, आमदार नसीम खान, काँग्रेस कोकण प्रभारी बी. संदीप, भाई जगताप, माजी आमदार सुभाष चव्हाण, राजन भोसले, विजय सावंत, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत आदी उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते विखे-पाटील म्हणाले, नाणार प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध आहे. हे आम्ही वेळोवेळी सांगितले आहे. सभागृहातही आमची हिच भूमिका राहिली आहे. पण शिवसेनेने यावर राजकारण केले. त्यांची बाहेर एक भूमिका असते आणि आत दुसरी भूमिका असते. शिवसेना नेहमी दुहेरी भूमिकेत असते, असा आरोप यावेळी विखे- पाटील यांनी केला. नाणार प्रकल्पग्रस्तांना घेऊन आम्ही दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्यामुळे काँग्रेसची भूमिका ही विरोधांची अधिकृत आहे, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. मात्र सरकार नवनवीन प्रकल्पांची घोषणा करत आहे. जनता या सरकारच्या घोषणाबाजीला फसणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच आमदार नितेश राणे हे जर काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येऊन काँग्रेसवरच टीका करत असतील आणि ते स्वाभिमानच्या व्यासपीठावर उपस्थित राहत असतील, तर आम्ही ही बाब प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या निर्दशनास आणू देऊ, असेही विखे-पाटील यांनी सांगितले.