गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक असेल शिवसेनेचा चेहरा
By admin | Published: February 7, 2017 04:42 PM2017-02-07T16:42:23+5:302017-02-07T16:42:23+5:30
उद्धव ठाकरे यांनी पाटीदार आंदोलनाचा प्रमुख हार्दिक पटेल गुजरात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा चेहरा असेल अशी घोषणा केली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - शिवसेना आणि भाजपामधील वाद टोकाला पोहोचला असल्याचं दिसत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाटीदार आंदोलनाचा प्रमुख हार्दिक पटेल गुजरात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा चेहरा असेल अशी घोषणा केली आहे. याचा अर्थ गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये शिवसेनेचं वजन नसलं तरी, भाजपासाठी डोकेदुखी ठरलेल्या हार्दिकला निवडणुकीत मुख्य चेहरा जाहीर केल्याने दोन्ही पक्षांमधील तणाव आणि रस्सीखेच अजून वाढण्याची शक्यता आहे.
हार्दिक पटेल सोमवारी मुंबईत आले आहेत. यावेळी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करताना हार्दिक दिसण्याची शक्यता आहे. मातोश्रीवर जाऊन त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांची संयुक्त पत्रकार परिषदही पार पडली. यावेळी बोलताना हार्दिकने 'शेर तो शेर ही होता है, उसे किसी की जरुरत नहीं,' असं म्हणत शिवसेनेवर स्तुतीसुमनं उधळली.
शिवसेनेने यावेळी महापालिका निवडणुकीत 11 गुजराती उमेदवार उतरवले आहेत. भाजपाचे समर्थक मानले जाणा-या गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिवसेना हार्दिकची मदत घेत असल्याचं बोललं जात आहे.
'महाराष्ट्राची भूमी ही वीरांची भूमी आहे. त्याच भूमीतील चांगल्या लोकांना भेटायला आलो आहे. सध्या देशाची सत्ता वाईट लोकांची आहे,' असं म्हणत हार्दिक पटेलने यावेळी भाजपावर निशाणा साधला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर टीका केली असून भाजपसोबत मतभेदांबरोबरच टोकाचे मनभेद झाले असल्याचं बोलले आहेत. एकीकडे मुख्यमंत्री पाच वर्ष माझ्या सरकारला धोका नाही असं सांगत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राज्याच्या सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत.