शिवसेनेकडून दगाफटक्याची खडसेंना भीती!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 07:01 AM2019-03-14T07:01:45+5:302019-03-14T07:02:04+5:30
युती धर्माचे पालन न झाल्यास त्याचे अन्य ठिकाणी पडसाद उमटतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मुक्ताईनगर : गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी युती तोडल्याचा राग म्हणून रक्षा खडसे यांना रावेर मतदारसंघात शिवसेनेकडून दगाफटका होण्याची भीती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी वाटत असून, युती धर्माचे पालन न झाल्यास त्याचे अन्य ठिकाणी पडसाद उमटतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
रावेर लोकसभा मतदार संघातून खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या विद्यमान खासदार आहेत. यंदाही भाजपाकडून त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे स्वत: खडसे यांनी प्रचाराची सुत्रे हाती घेतली आहेत. बुधवारी त्यांनी मुक्ताईनगरात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी खडसे म्हणाले, गेल्या निवडणुकीत शिवसेना व भाजपाची युती तोडण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी सामुहिकपणे घेतला होता. युती तोडण्याची घोषणा केवळ आपण केली होती. युती तुटल्यामुळेच भाजपाचा मुख्यमंत्री झाला. मात्र काळानुरुप मागील गोष्टी विसरल्या पाहिजे. आता युती झाली आहे तर युती धर्म पाळला गेला पाहिजे.