पहिला दिवस शिवसेनेचा!

By admin | Published: December 8, 2015 01:37 AM2015-12-08T01:37:01+5:302015-12-08T01:37:01+5:30

स्वतंत्र विदर्भासाठी जनमताचा कौल घेण्याची मागणी करणाऱ्या महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची पदावरून हकालपट्टी करा, अशी घोषणा देत सत्ताधारी शिवसेनेने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाजी मारली.

Shiv Sena's first day! | पहिला दिवस शिवसेनेचा!

पहिला दिवस शिवसेनेचा!

Next

अतुल कुलकर्णी,  नागपूर
स्वतंत्र विदर्भासाठी जनमताचा कौल घेण्याची मागणी करणाऱ्या महाधिवक्ता श्रीहरी अणे यांची पदावरून हकालपट्टी करा, अशी घोषणा देत सत्ताधारी शिवसेनेने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाजी मारली. मात्र आम्ही हा विषय विधानसभेत मांडू असे सांगत काँग्रेसने या प्रकरणापासून आज अंग काढून घेतले.
श्रीहरी अणे हे महाधिवक्ता आहेत. त्यांनी स्वतंत्र विदर्भासाठी जनतेचे मत घेण्याची माणगी करणे याचा अर्थ सरकारने ती मागणी करणे असा त्याचा अर्थ निघतो. बेळगाव कारवार सीमाप्रश्न सध्या सर्वाेच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असताना राज्याच्या महाधिवक्त्याने अशी भूमिका घेणे, मी स्वत: विदर्भवादी आहे, अशा मुलाखती माध्यमांना देणे यामुळे बेळगावची केसही कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा सूर उमटत असताना या विषयाचे भांडवल करण्याची संधी काँग्रेसने मात्र पहिल्याच दिवशी गमावली.
शिवसेना आज या विषयावर आक्रमक झाली. पायऱ्यांवर आंदोलन करत, घोषणा देत त्यांनी विधानसभा दणाणून सोडली. आज पहिल्याच दिवशी शोकप्रस्ताव होते. त्याशिवाय सभागृहात दुसरा विषय नव्हता. मात्र शिवसेनेने सभागृहाबाहेर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सेना सभागृहातही काही तरी करेल की काय या उत्सुकतेपोटी पत्रकार गॅलरीही गच्च भरून गेली.
काँग्रेसने मात्र या महाधिवक्ता अणे यांचा विषय आम्ही विधासभेत मांडू, असे सांगून या विषयापासून पळ काढला. याबाबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, शिवसेनेने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही सभागृहात काय ते मांडू ,असे सांगितले. सोमवारी श्रीहरी अणे यांचे व्याख्यान विधिमंडळात ठेवले होते ते आमच्या मागणीमुळेच विधिमंडळाला रद्द करावे लागले,असा दावाही विखे यांनी केला.
तर प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, महाधिवक्ता हे घटनात्मक पद आहे. त्यांची भूमिका ही सरकारची भूमिका आहे का? हे सरकारने स्पष्ट करावे. पण सभागृहात अथवा विधिमंडळ परिसरात कोणता विषय कसा मांडायचा हा विरोधी पक्षनेत्यांचा प्रश्न आहे. त्यांनाच विचारा.
स्वतंत्र विदर्भासाठी जनमत घेण्याच्या अणे यांच्या वक्तव्यावरून मुंबईत शिवसेनेने ठिकठिकाणी आंदोलन केले. स्थानिक विभागप्रमुख आणि लोकप्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली जमलेल्या शिवसैनिकांनी निषेध नोंदविला. हुतात्मा चौक, दादर, कुर्ला, विलेपार्ले, घाटकोपर, बोरीवली आदी ठिकाणी ‘अखंड महाराष्ट्राचा विजय असो’, ‘अखंड महाराष्ट्र राहिलाच पाहिजे’, ‘महाधिवक्ता श्रीहरी अणे यांचा निषेध’ असे फलक दाखवत शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली.

Web Title: Shiv Sena's first day!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.