Maharashtra CM: मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटलांच्या मुलाला शपथविधीचे निमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 16:00 IST2019-11-28T15:52:06+5:302019-11-28T16:00:29+5:30
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. जानेवारी, 2018 मध्ये 80 वर्षीय धर्मा पाटील यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन केले होते.

Maharashtra CM: मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटलांच्या मुलाला शपथविधीचे निमंत्रण
मुंबई : जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला शिवसेनेने आज उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीसाठी बोलावले आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. जानेवारी, 2018 मध्ये 80 वर्षीय धर्मा पाटील यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन केले होते. उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला होता. धर्मा पाटील यांच्या पाच एकर जमिनीच्या मोबदल्यात केवळ चार लाखाचा मोबदला औष्णिक वीज प्रकल्पासाठी वीज निर्मिती करणाऱ्या यंत्रणेने देऊ केला. मात्र हा मोबदला योग्य नसल्यानं वीज प्रकल्पासाठी जमीन संपादित करणा-या यंत्रणेकडून दुजाभाव झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.
संपादित जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी गेली अनेक दिवस मंत्रालयात चकरा मारल्या पण तरीही योग्य दाद मिळत नसल्याने धर्मा पाटील हतबल झाले होते. यावर आज मुंबईत आलेल्या धर्मा पाटील यांच्यामुलाने भाजपवर टीकेचे आसूड ओढले आहेत. नरेंद्र पाटील यांना शिवसेनेने शपथविधीचे निमंत्रण दिले आहे. त्यांनी सांगितले की, शिवसेना भवनातून फोन आला. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, चांगल्या योजना राबवाव्यात. भाजपाने माझ्या वडिलांनाही न्याय दिला नाही. त्यांनी तर आत्महत्या केली. राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांनाही न्याय दिला नसल्याचा आरोप केला.
अन्य एका शेतकरी महिलेने सांगितले की, भाजपा सरकारने गेल्या पाच वर्षांत खूप त्रास दिला. शेतकऱ्यांना न्याय द्यावा, उद्धव ठाकरेंकडून मोठ्या अपेक्षा आहेत. शेतकऱ्याची आई आहे.