शिवसेनेला अनेक पदाधिकाऱ्यांचा ‘जय महाराष्ट्र’!
By admin | Published: September 28, 2016 01:07 AM2016-09-28T01:07:51+5:302016-09-28T01:07:51+5:30
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित करून मराठा समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी, जिल्ह्यातील शिवसेनेच्या अनेक
बुलडाणा : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकात आक्षेपार्ह व्यंगचित्र प्रकाशित करून मराठा समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी, जिल्ह्यातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
‘सामना’त प्रकाशित झालेल्या व्यंगचित्रामुळे आपल्या भावना दुखावल्याचे सांगून उपजिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, बुलडाणा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष तसेच विद्यमान नगरसेवक हेमंत खेडेकर यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर व त्यांचे बंधु कपिल खेडेकर यांच्यासोबतच अनेक शिवसैनिकांनी शिवसेनेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ ठोकला. खेडेकर बंधुंच्या या निर्णयाने चिखली तालुक्यात, शिवसेनेत खळबळ उडाली आहे.
मेहकर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजय जाधव यांनी यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नगरसेवक पदाचा राजीनामा पाठविला आहे. त्यांच्यासोबतच शिवसेना तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे यांनीही शिवसेनेच्या पदाचे राजीनामे पाठविले आहेत. लोणार तालुक्यात गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेची धुरा सक्षमपणे सांभाळणारे तालुका शिवसेना प्रमुख प्रा. बळीराम मापारी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवकुमार तेजनकर, पंचायत समिती सदस्य मनोज तांबीले, पुंजाराम दहातोंडे, जि.प.सदस्य सुलताने या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे ‘मातोश्री’वर पाठविले आहेत. यासोबतच नांदुरा तालुका प्रमुख बाळासाहेब धोरण, उप-तालुका प्रमुख सुनील जुनारे, वडनेरचे सर्कल प्रमुख संतोष बिजवे, मलकापूरचे युवा तालुका प्रमुख दीपक जवरे यांनीही राजीनामे पाठविले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)