"जर उतारवयात बाळासाहेबांची काळजी घेतली असती तर..."; शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 02:55 PM2024-01-17T14:55:21+5:302024-01-17T14:56:53+5:30
लोकांना सत्य कळाले आहे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा उद्धव ठाकरेंनी वापर केला असा आरोप शिवसेना सचिव किरण पावसकरांनी केला.
मुंबई - वापरा आणि फेका हीच उद्धव ठाकरेंनी केला. केवळ मी हिंदू इतके बोलतायेत परंतु हिंदुत्वाला आणि राम मंदिराला विरोध करणारे यांच्यासोबत उद्धव ठाकरे आहेत. मी घर सोडून जाईल असा मानसिक त्रास बाळासाहेबांना उतारवयात उद्धव ठाकरेंनी दिला. जर बाळासाहेबांची काळजी व्यवस्थित घेण्यात आली असती तर उद्याच्या राम मंदिराच्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या खांद्याला खांदा लावून बाळासाहेब ठाकरे तिथे उपस्थित राहिले असते. शिवसैनिकांनी याचा विचार केला पाहिजे. वारसा हक्काने तुम्ही सगळं मागता मग इतर दोन भाऊ आहेत त्यांनाही ते द्या ना...वारसा हक्क हा सगळ्यांचा असतो. बाळासाहेबांची संघटना दुसरीकडे विकली जाऊ नये म्हणून हे सगळे घडले. आमच्याकडे असलेले असंख्य व्हिडिओ जर दाखवले तर तुम्हाला जनतेत फिरणं मु्श्किल होईल असा इशारा किरण पावसकरांनी उद्धव ठाकरेंना दिला.
शिवसेनेचे सचिव माजी आमदार किरण पावसकर यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिले. किरण पावसकर म्हणाले की, ज्या नेतृत्वाने आयुष्यात कधीही आंदोलन केले नाही. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खाल्ल्या नाहीत. जेलमध्ये गेले नाहीत ते कॅमेऱ्यासमोर आक्रमकतेचे नाटक करताय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताईंनी संस्कार केलेला हा मुलगा आहे की दुसरा असा प्रश्न पडतो. ज्या एकनाथ शिंदेंनी अहोरात्र शिवसेनेच्या वाढीसाठी काम केले त्यांच्याबद्दल तुम्ही असे शब्द वापरतायेत. २०१९ ला जनतेसमोर जाताना बाळासाहेब ठाकरे-नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून निवडून आलात. मग निकालानंतर काँग्रेससोबत जाताना तुम्ही जनतेच्या भावना तुडवल्या. बाळासाहेबांच्या विश्वासाने जे शिवसैनिक घडले त्या सगळ्यांना तुडवा इतकेच काम केवळ उद्धव ठाकरेंनी केले. तुमच्यासोबत ४० आमदार, १३ खासदार होते म्हणून अमित शाह मातोश्रीवर आले होते. बाळासाहेबांचा मान ठेवण्यासाठी ते तिथे आले. परंतु आज तुमच्याकडे ढुकुंनही बघणार नाहीत असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
तसेच लोकांना सत्य कळाले आहे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा उद्धव ठाकरेंनी वापर केला. याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण, मालाडच्या उद्योनाला टीपू सुलतान नाव द्या. मौलवींचे पगार वाढवा. मदरशांना अनुदान वाढवून द्या हे सर्व निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतलेत. जर एकनाथ शिंदेंनी उठाव केला नसता तर ही शिवसेना तुम्ही बाहेर परदेशात जाऊन विकून आला असता. बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी जीवावर उदार होऊन केले. तुम्ही शिवसेना सोनियांच्या पायी ठेऊन आला. ती वाढवण्याचे आणि सांभाळण्याचे काम शिंदेंनी केले. केवळ घरात बसून काम करणे हेच तुम्ही केले. कुटुंबासोबत तुम्ही पिकनिकला पंढरपूरला गेले होते. मात्र वारीसाठी लागणारी व्यवस्था बघण्यासाठी जाणारा मुख्यमंत्री असा शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे. ही शिवसेना बाळासाहेबांची आहे. शिंदे कधीही ही माझी आहे असं म्हणत नाही. धारावीचा मोर्चा काढला त्यात सत्य समोर आले. त्यात भगवा झेंडा घेऊन पिता पुत्र फिरत होता. त्या मोर्चात कम्युनिस्टाचे झेंडे मोर्चात जास्त फडकत होते. कम्युनिस्टांना हटवण्यासाठी बाळासाहेबांसोबत असणाऱ्या शिवसैनिकांनी जेल भोगली. मात्र त्यात कम्युनिस्टांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे पुढे जातायेत. आज ते शिवसैनिकही हा बाळासाहेबांचा पुत्र कसा असं म्हणतायेत असं पावसकरांनी म्हटलं.
दरम्यान, न्यायालयात आपण गेलात, निकालाविरोधात कोर्टात गेलात. जर एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर त्यावर चर्चा नको असं म्हटलं जाते. परंतु माध्यमांसमोर येऊन वेगळं दाखवण्याचा प्रकार पहिल्यांदा घडलात. न्यायालयाने सुमोटो दाखल करून यावर कारवाई व्हायला हवी. जनतेच्या न्यायालयात यायचं असेल तर उघड आणि स्पष्टपणे कधीही समोर या. मागच्या दरवाजातून येऊ नका. तुमच्यासोबत बसलेले मागून निवडून आलेले आहेत. जनतेतून निवडून आलेले नाहीत. जर उबाठाचे प्रमुख कुठल्याही मतदारसंघातून उभे राहणार असतील तर माझ्यासारखा शिवसैनिकही तुम्हाला चॅलेंज देऊन उभा राहील. ही परिस्थिती आज तुमच्यासमोर आलीय. स्वत:ची केलेली पापे ही सोयीनुसार तुम्ही कालच्या पत्रकार परिषदेत दाखवली अशा शब्दात शिवसेनेने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.