छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल; राऊतांची शाहू महाराजांना साद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 11:50 AM2024-03-05T11:50:23+5:302024-03-05T11:51:47+5:30

ते शिवसेनेकडून लढणार का यावर त्यांनी निर्णय घ्यावा. जर लढणार असतील तर महाविकास आघाडीत आम्ही त्यावर चर्चा करू असंही संजय राऊतांनी स्पष्ट केले. 

Shiv Sena's Kolhapur seat, Shahu Maharaj should contest election with Mashal symbol - Sanjay Raut | छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल; राऊतांची शाहू महाराजांना साद

छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल; राऊतांची शाहू महाराजांना साद

मुंबई - Sanjay Raut on Kolhapur LS Seat ( Marathi News ) कोल्हापूर लोकसभेची जागा सातत्याने ३० वर्ष आम्ही लढतोय. कोल्हापूर मतदारसंघात शिवसेनेला मानणारा, मतदान करणारा साधारण साडेतीन लाख मतदार आहे. ही जागा सोडू नये यासाठी आमच्यावर दबाव आहे. छत्रपतींचे नाव आज मी ऐकतोय. जागेबाबत अजून त्यांच्याशी चर्चा झाली नाही. पण जर छत्रपतींनी हाती मशाल धरली तर महाराष्ट्र उजळून निघेल असं विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, कोल्हापूरची जागा शिवसेनेने जिंकलेली आहे आणि जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही हे जागावाटपातील सूत्र आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना सगळ्यांनी मिळून राज्यसभेवर पाठवावं ही शिवसेनेची भूमिका तेव्हाही होती आणि आजही आहे. शिवसेनेचा अद्याप शाहू महाराजांसोबत लोकसभा लढण्याबद्दल चर्चा झालेली नाही. त्यामुळे काँग्रेसनं काय सांगितलं माहिती नाही. ही शिवसेनेची जागा असल्याने सगळ्यांनी मिळून शाहू छत्रपतींशी बोलण्याचं ठरवलं आहे, मीदेखील त्यांच्याशी भेटून चर्चा करेन असं राऊतांनी सांगितले. 

तसेच ती जागा शिवसेनेची त्यामुळे ते मशाल चिन्हावर लढण्यास तयार आहेत का हे पाहावे लागेल. कारण छत्रपतींनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं की नाही यावर लोकांचे वेगवेगळे प्रवाह आहेत. आम्ही छत्रपतींना मानतो, त्यांच्या विचारधारेला मानतो. जागा शिवसेनेकडे आहे त्यामुळे ते शिवसेनेकडून लढणार का यावर त्यांनी निर्णय घ्यावा. जर लढणार असतील तर महाविकास आघाडीत आम्ही त्यावर चर्चा करू असंही संजय राऊतांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, महाविकास आघाडीत काही भांडण नाही. कुठलेही मतभेद नाहीत. प्रकाश आंबेडकरांनाही हे माहिती आहे. जागावाटपावर चर्चा होते. एखाद्या जागेवर आग्रह त्यांचाही असतो, आपलाही असतो. कार्यकर्त्यांचा दबाव असतो. प्रकाश आंबेडकरांकडून यादी आलीय. ज्या जागेवर काम केलंय त्यावर चर्चा होणार आहे. प्रकाश आंबेडकर, शरद पवार, उद्धव ठाकरे उद्या एकत्र बसून चर्चा करतील. जे देशाचे शत्रू आहेत, संविधानाच्या लढाईविरोधात प्रकाश आंबेडकर भूमिका घेणार नाहीत असा दावाही राऊतांनी केला. 

Web Title: Shiv Sena's Kolhapur seat, Shahu Maharaj should contest election with Mashal symbol - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.