पक्षप्रमुखांच्या भूमिकेवर शिवसेनेचे मंत्री नाराज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2015 12:35 AM2015-07-15T00:35:20+5:302015-07-15T00:35:20+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याच्या भूमिकेला आमदारांच्या बैठकीत मंगळवारी एकमुखी पाठिंबा देण्यात आला असला
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याच्या भूमिकेला आमदारांच्या बैठकीत मंगळवारी एकमुखी पाठिंबा देण्यात आला असला तरी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री ठाकरे यांच्या भूमिकेवर नाराज आहेत. मागील सरकारमधील कर्जमाफी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील बँकांच्या पथ्यावर पडणारी होती. त्यामुळे भाजपाची कोंडी करताना राष्ट्रवादीला फायदा होणारी भूमिका शिवसेनेने घेऊ नये, असे सेनेच्या दोन मंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी खासगीत बोलताना सांगितले.
शिवसेना आमदारांच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होण्याचा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची भूमिका शिवसेना प्रमुख ठाकरे यांनी घेतली असून, ही मागणी सभागृहात लावून धरण्याचे ठरले. शेतकऱ्यांबरोबरच अन्य प्रश्नांवरही सभागृहात बोलताना आपली मते सडेतोडपणे व्यक्त करण्याचे बैठकीत ठरले. शिवसेना राज्यातील सत्तेत सहभागी असली तरी सत्तेचे लाभ मुख्यत्वे भाजपाला होत असल्याने सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून मूग गिळून बसण्याची गरज नाही. राज्यातील भाजपा मंत्र्यांवर झालेल्या आरोपांशी शिवसेनेचा संबंध नाही. त्यामुळे या मंत्र्यांच्या बचावाकरिता शिवसेनेने सभागृहात आक्रमक होण्याची गरज नाही, असेही बैठकीत ठरले. (विशेष प्रतिनिधी)
भाजपावर तोंडसुख
सरकारमधील नियुक्त्या, बदल्या आणि निर्णय यावर केवळ भाजपाचा वरचष्मा असून, शिवसेनेला कुठेही विश्वासात घेतले जात नाही. प्रत्येक ठिकाणी भाजपाच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून नियुक्त्या केल्या जात आहेत. शिवसेनेचे आमदार या नात्याने काही सुचवले, शिफारस केली तर त्याला केराची टोपली दाखवली जाते, अशा तक्रारी आमदारांनी बैठकीत केल्या.
शेलार यांची कुलंगडी बाहेर काढणार
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार हे सातत्याने शिवसेनेला टीकेचे लक्ष्य करीत आहेत. शेलार यांनी मुंबई महापालिकेत केलेला भ्रष्टाचार, त्यांच्या आदेशावरून झालेले निर्णय संकलित करून शेलार यांची कुलंगडी बाहेर काढण्याचा निर्णय या वेळी झाल्याचे समजते.