शिवसेनेच्या नंदा पाटील पतीसह गेल्या भाजपात

By Admin | Published: January 20, 2017 04:07 AM2017-01-20T04:07:43+5:302017-01-20T04:07:43+5:30

एकीकडे शिवसेनेमध्ये इतर पक्षांतील बड्या नगरसेवकांचे इनकमिंग सुरू असतानाच आता पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे.

Shiv Sena's Nanda Patil husband and the last BJP | शिवसेनेच्या नंदा पाटील पतीसह गेल्या भाजपात

शिवसेनेच्या नंदा पाटील पतीसह गेल्या भाजपात

googlenewsNext


ठाणे : एकीकडे शिवसेनेमध्ये इतर पक्षांतील बड्या नगरसेवकांचे इनकमिंग सुरू असतानाच आता पक्षाला एक मोठा धक्का बसला आहे. गोकूळनगर भागातील कृष्णा पाटील या निष्ठावान शिवसैनिकाने शिवसेनेच्या सध्याच्या कारभारावर जाहीर नाराजी व्यक्त करून नगरसेविका नंदा पाटील (पत्नी) यांच्यासह रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. शिवसेनेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या निवडणुकीची रंगत आता आणखी वाढू लागली असून पक्षांतराचे वारेही वेगाने वाहू लागले आहेत. बाळकुमच्या भोईर अ‍ॅण्ड कंपनीने राष्ट्रवादीला धक्का देऊन शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर, आता शिवसेनेला जबरदस्त धक्का देऊन थेट निष्ठावान शिवसैनिकांची फळीच आपल्या कळपात आणण्यास भाजपाने सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या कट्टर नगरसेविका नंदा पाटील यांनी आपल्या पतीसमवेत बुधवारी रात्री उशिरा भाजपामध्ये प्रवेश केला. महापालिका आवारात मागील वर्षी आयुक्तांबरोबर कृष्णा पाटील यांचा वाद झाला होता. त्यानंतर, त्यांच्या बाजूने शिवसेना उभी राहिली नव्हती. तेव्हापासूनच त्यांच्या मनात ही सल होती. २००७ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांची आई शारदा या भागातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. त्यानंतर, २०१२ मध्ये त्यांची पत्नी नंदा या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असतानादेखील शिवसेनेने त्या ठिकाणी पक्षातील एकाला त्यांच्याविरोधात उभे केले होते. असे अपमान होत असतानाच त्यांच्यावर गोकूळनगर, आझादनगर, शेलारपाडा, गोकूळदासवाडी खोपट, मिलिंदनगर येथील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पाशी सतत टाकलेल्या अडथळ्यांनी आणि येथील झोपडीधारकांना हक्काचे घर देण्यासाठी धडपड सुरू असताना त्यातही वारंवार आडकाठी आणली गेली. या सर्व कारणांमुळेच आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षात तिकीट नक्की असतानाही घुसमट, गटबाजी आणि नव्या नियुक्त्यांचा सल असल्याने भाजपात प्रवेश केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
‘आयुष्यातून उठविले’
एकनाथ शिंदे यांच्याबाबत आदर आहे. पण सेनेतील गटबाजी आयुष्यातून उठवणारी असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. आधार वाटणारी शिवसेनेतील सिस्टीम आता संपूर्णपणे बिघडल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Shiv Sena's Nanda Patil husband and the last BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.