शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक, आदित्य ठाकरेंची आज नेतेपदी होणार निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:27 AM2018-01-23T03:27:28+5:302018-01-23T03:27:42+5:30
शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी होत असून तीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून फेरनिवड करण्यात येईल.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मंगळवारी होत असून तीत उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून फेरनिवड करण्यात येईल. तर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना नेतेपद दिले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून होत असलेल्या या बैठकीत शिवसेनेच्या नेत्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत.
सध्या शिवसेनेत मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, रामदास कदम, संजय राऊत, दिवाकर रावते आणि गजानन कीर्तिकर हे आठ नेते आहेत.
त्यातील दोन-तीन जणांना वगळून नवीन चेहरे दिले जातील आणि त्यात आदित्य यांचाही समावेश असेल, असे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेत ३१ उपनेते असून त्यांच्यातही बदल केले जातील. शिवसेना राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा मानस आदित्य ठाकरे यांनी मध्यंतरी व्यक्त केला होता. उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या भाषणात यासंबंधी घोषणा होण्याचीही शक्यता आहे.
शिवसेनेशी निष्ठावान राहण्याचे प्रतीक म्हणून काही वर्षांपासून शिवबंधन बांधण्याची पद्धत रूढ करण्यात आली.
आता शिवसेनेचा वाघ अंकित असलेल्या अंगठ्यांच्या वाटपाची टूम निघाली आहे. अर्थात हा शिवसेनेचा अधिकृत कार्यक्रम आहे का, हे उद्याच स्पष्ट होईल.