शिवसेनेचा ११९ जागांचा प्रस्ताव अमान्य - भाजप
By Admin | Published: September 21, 2014 02:26 PM2014-09-21T14:26:18+5:302014-09-21T16:03:55+5:30
शिवसेनेच्या ११९ जागांचा प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगत महायुतीच्या निर्णयांबाबत वृत्तवाहिन्यांद्वारे चर्चा न करता प्रत्यक्ष भेटूनच चर्चा करु असे प्रत्युत्तर भाजपने दिले आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २१ - 'युती टिकवायची असेल तर अंतिम प्रस्ताव कधीच नसतो. शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजप नाखूष असल्याचे स्पष्ट करत यासंदर्भात टीव्हीद्वारे चर्चा करण्याऐवजी प्रत्यक्ष भेटूनच चर्चा करु असे प्रत्युत्तर भाजप नेत्यांनी शिवसेनेला दिले आहे. मात्र युती कायम राहावी हीच भाजपचीही इच्छा असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे युतीमधील खेचाखेची अद्यापही सुरुच असल्याचे दिसते.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजपला ११९ जागा देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. दिल्लीत भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक सुरु असून या बैठकीनंतर भाजप नेते विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे. विनोद तावडे म्हणाले, भाजपला १९ तर शिवसेनेला ५९ जागांवर आत्तापर्यंत कधीच विजय मिळालेला नाही. या जागांच्या अदलाबदली विषयी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. याचा फायदा युतीलाच होईल.
युती कायम राहावी यासाठी भाजपने नेहमीच जागांचा त्याग केला आहे. याउलट शिवसेनेने आजपर्यंत भाजपला एकही जागा वाढवून दिलेली नाही असा पुनरुच्चार एकनाथ खडसे यांनी केला. युती झाली त्यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजप ३२ तर शिवसेना १६ जागांवर निवडणूक लढवायची. यानंतर भाजपने शिवसेनेला सहा जागा वाढवून दिल्या. तसेच महायुती भक्कम करण्यासाठी आरपीआय नेते रामदास आठवले यांनाही राज्यसभेत भाजपच्या कोट्यातून जागा दिली. तर युती झाल्यापासून विधानसभा निवडणुकीत शिवसेनेन भाजपला फक्त २ जागाच वाढवून दिल्या आहेत असे एकनाथ खडसे यांनी निदर्शनास आणून दिले. भाजप आधीपासून ११९ जागांवर निवडणूक लढवत आली असून शिवसेनेच्या प्रस्तावात नवीन काहीच नसून यावर भाजप समाधानी नाही असे खडसे यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणांनतर राज्यातील भाजप कोअर कमिटीची बैठक झाली असून या बैठकीत भाजपच्या कोअर कमिटीचे मतं भाजपच्या संसदीच बोर्डाच्या बैठकीत मांडू. ही बैठक आज संध्याकाळी होईल असे विनोद तावडेंनी सांगितले. राज्यात परतल्यावर शिवसेनेसोबत प्रत्यक्ष भेटूनच चर्चा केली जाईल असेही तावडेंनी नमूद केले.