काँग्रेसच्या सभेत शिवसेनेचा राडा!
By admin | Published: May 15, 2016 05:40 AM2016-05-15T05:40:30+5:302016-05-15T05:40:30+5:30
महापालिकेतील गैरकारभाराबाबत काँग्रेसने शनिवारी कांदिवलीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये शिवसैनिकांनी राडा घातला.
मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुका घोषित होण्यापूर्वीच शहरातील वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. महापालिकेतील गैरकारभाराबाबत काँग्रेसने शनिवारी कांदिवलीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये शिवसैनिकांनी राडा
घातला. घोषणाबाजी करत दगडफेक तसेच बाटल्या फेकणाऱ्या २० शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कांदिवली येथील आकुर्ली रोडवरील सभागृहात शनिवारी रात्री काँग्रेसचे नगरसेवक राम आशिष गुप्ता यांनी बीएमसी ‘पोलखोल’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम, महापालिकेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा आणि संदेश कोंडविलकर आदी उपस्थित होते. संजय निरुपम यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर जोरदार तोफ डागली. याचवेळी उपस्थितांमध्ये असणाऱ्या शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्याविरोधात जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. शिवसैनिकांच्या या गोंधळामुळे सभेतील वातावरण तापले. त्यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र त्यास न जुमानता शिवसैनिकांनी दगडफेक सुरू केली आणि बाटल्याही फेकल्या. (प्रतिनिधी)
। आयोजक राम आशीष गुप्ता यांना
काही शिवसैनिकांकडून आमच्या
पक्षाचा कार्यक्रमात उल्लेख करू नका, असा धमकीवजा इशारा देण्यात येत होता. शिवसैनिकांनी कार्यक्रमात
व्यत्यय आणला. शिवाय दगडफेक
केली. आम्ही पळालो नाही तर चारकोप येथे कार्यक्रमासाठी रवाना झालो. या घटनेचा पुढील नियोजित कार्यक्रमांवर काहीएक परिणाम होणार नाही.
यापुढेही आम्ही महापालिकेतील भ्रष्टाचाराचा पाढा लोकांसमोर वाचणारच आहोत.
- संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस