'सरकार कोसळणार', या सततच्या टीकेला शिवसेनेचे अयोध्या दौऱ्यातून प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2020 02:10 PM2020-03-07T14:10:06+5:302020-03-07T14:11:31+5:30
तीन्ही पक्षांच्या काही नेत्यांच्या वक्तव्यांवरून मतभेद झाल्याचे माध्यमांत दिसून आले होते. मात्र सुनील केदार अयोध्येला गेल्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
मुंबई - राज्यात विसंवादाचे सरकार स्थापन झाले असून हे सरकार कधीही कोसळेल अशी टीका भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीवर करण्यात येत आहे. तर पुढील पंधरा दिवसांत सरकार कोसळणार असही काही नेत्यांनी सांगितले होते. मात्र शिवसेनेने आपले हिंदुत्वावादी विचार प्रखर असून मित्रपक्षही आमच्या सोबत असल्याचा संदेश देत अयोध्या दौरा काढून भाजपच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत. या दौऱ्यात शिवसेनेच्या मंत्र्यांसह काँग्रेसनेते आणि मंत्री सुनील केदार देखील अयोध्येत दाखल झाले आहेत.
दरम्यान शिवसेनेचे हिंदुत्व आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारधामुळे सरकार लवकरच कोसळेल असे अंदाज भाजपच्या नेत्यांनी आतापर्यंत बांधले आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, नारायण राणे, रावसाहेब दानवे, प्रतीम मुंडे या भाजप नेत्यांचा समावेश आहे. मात्र सुनील केदार शिवसेना नेत्यांसोबत अयोध्येला गेल्याने विरोधकांच्या सरकार कोसळणार या वक्तव्याला चाप लागणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने नुकतेच 100 दिवस पूर्ण केले आहे. या 100 दिवसांत तीन्ही पक्षांच्या काही नेत्यांच्या वक्तव्यांवरून मतभेद झाल्याचे माध्यमांत दिसून आले होते. मात्र सुनील केदार अयोध्येला गेल्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही सुरळीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.