नाशिकमध्ये शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार

By admin | Published: January 31, 2017 02:12 AM2017-01-31T02:12:03+5:302017-01-31T02:12:03+5:30

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेनेने भाजपाशी युती तोडल्यामुळे या निवडणुकीची सारी राजकीय

Shiv Sena's role in Nashik will be decisive | नाशिकमध्ये शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार

नाशिकमध्ये शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरणार

Next

नाशिक : प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेनेने भाजपाशी युती तोडल्यामुळे या निवडणुकीची सारी राजकीय गणितं बदलली आहेत. शिवसेनेची मतं आपल्या पारड्यात पडतील, असे काँग्रेसला वाटत आहे, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रचारातून अंग काढून घेतल्याने भाजपालाही हायसे वाटले आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या वळणावर पोहोचलेल्या या निवडणुकीने अखेरच्या क्षणी उत्कंठा वाढविली आहे.
पारंपरिकपणे भाजपाच्या ताब्यात असलेल्या हा मतदारसंघ सहा वर्षांपूर्वी कॉँग्रेसने आपल्याकडे खेचून घेत डॉ. सुधीर तांबे यांच्या ताब्यात दिला असून, आत्ताही निवडणुकीच्या रिंगणात शिक्षक लोकशाही आघाडीच्या पाठिंब्यावर कॉँग्रेसकडून तांबे हेच रिंगणात आहेत, तर भाजपाने गेल्या दोन निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. प्रशांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. वरकरणी या दोन्ही पक्षांमध्येच ही लढत दिसत असली तरी अन्य राजकीय पक्षांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केल्यामुळे डॉ. तांबे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने उभी राहण्याची व्यक्त केलेली अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने आघाडी करण्यासाठी चालविलेली टाळटाळ. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अंग मोडून प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीत. सध्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या निरोपाची ते वाट पहात आहेत. या दोन्ही बाबी डॉ. तांबे यांच्या अडचणी वाढविणाऱ्या व भाजपाला उत्साहित करणाऱ्या असल्या तरी, शिवसेनेने भाजपाबरोबर तोडलेल्या युतीमुळे कॉँग्रेसला हायसे वाटणे स्वाभाविक आहे. सेना-भाजपात सध्या असलेले वैर पाहता, भाजपाच्या पराभवासाठी सैनिक त्वेषाने पेटून उठतील अशीच रणनिती कॉँग्रेसने आखली आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका जशी भाजपासाठी महत्त्वाची आहे, तशीच ती कॉँग्रेससाठी देखील आहे.


निवडणूक शिक्षकांसाठी, चर्चा राजकारणाची
या निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून, दोन्ही पक्षांनी मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे दावे करून स्वत:ची समजूत काढण्याचा प्रयत्न चालविला असला तरी, निवडणुकीच्या रिंगणात तिसऱ्या आघाडीचे कॉ. प्रकाश देसले यांनीदेखील कॉँग्रेस व भाजपापुढे पर्याय उभा केलेला आहे.
त्यामुळे या निवडणुकीत एरव्ही राजकीय मुद्द्याला फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही, यंदा मात्र राजकीय मुद्द्यावरच ही निवडणूक लढविली जात आहे. पदवीधरांचे प्रश्न अनेक आहेत, त्याची चर्चा या प्रचारात झाली नाही, फक्त शिक्षक हाच एकमेव पदवीधर असल्याच्या समजातून फक्त शैक्षणिक संस्थांवरच साऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
त्यामुळे कोणत्या संस्थावर कोणाचे वर्चस्व आहे त्यावरच निवडणुकीचे गणितं मांडले जात आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातूनच भविष्यातील शिक्षक मतदारसंघाचेही भवितव्य अजमाविले जाणार असल्याने राजकीय पक्षांनी त्या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Shiv Sena's role in Nashik will be decisive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.