बिहारमधील फॉर्म्युल्याने शिवसेनेला बळ, भाजपात मात्र अस्वस्थता; लोकसभेत निम्म्या जागा मागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 05:24 AM2018-12-25T05:24:36+5:302018-12-25T05:24:48+5:30

बिहारमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करताना भाजपाने स्वत:कडे केवळ १७ जागा ठेवत १३ जागा मित्र पक्षांना तडजोडीत सोडल्याने महाराष्ट्रात जागा वाटपाची चर्चा करताना शिवसेनेला अधिकच बळ येणार असल्याचे दिसते.

Shiv Sena's strength in Bihar formation, disorder in BJP; The possibility of seeking half the seats in the Lok Sabha | बिहारमधील फॉर्म्युल्याने शिवसेनेला बळ, भाजपात मात्र अस्वस्थता; लोकसभेत निम्म्या जागा मागण्याची शक्यता

बिहारमधील फॉर्म्युल्याने शिवसेनेला बळ, भाजपात मात्र अस्वस्थता; लोकसभेत निम्म्या जागा मागण्याची शक्यता

Next

मुंबई - बिहारमध्ये लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करताना भाजपाने स्वत:कडे केवळ १७ जागा ठेवत १३ जागा मित्र पक्षांना तडजोडीत सोडल्याने महाराष्ट्रात जागा वाटपाची चर्चा करताना शिवसेनेला अधिकच बळ येणार असल्याचे दिसते.

बिहारमध्ये गेल्यावेळी ३० जागा लढविणाऱ्या भाजपाने यंदा १३ जागांवर पाणी सोडले. त्यातील पाच जागा तर गेल्यावेळी जिंकलेल्या होत्या. २०१९ मध्ये स्वबळावर केंद्रात सत्ता येणे कठीण असल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपाने मित्र पक्षांना गोंजारणे सुरू केले असल्याचे यावरून दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेला तर अन्य राज्यांमधील भाजपाच्या मित्र पक्षांनादेखील भाजपाकडून अधिक आणि मनासारख्या जागा मिळविता येऊ शकतात, असा विश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरमध्ये सोमवारी भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघात केल्यानंतर भाजपा-शिवसेनेतील दरी अधिकच वाढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची लोकसभेसाठीची बोलणी अंतिम टप्प्यात असताना युतीची बोलणी या ताणलेल्या संबंधांमुळे अद्याप सुरू होऊ शकलेली नाही.
२०१४ मध्ये युतीत भाजपाने २४ जागा लढविल्या आणि २३ जिंकल्या होत्या. शिवसेनेने २० जागा लढून १८ जिंकल्या होत्या. शिवसेनेकडील तीन-चार जागा आता भाजपाला हव्या आहेत पण तीन राज्यांमधील पराभव, घटक पक्षांना सांभाळून ठेवण्यावर पक्षनेतृत्वाने दिलेला भर यामुळे आता भाजपा जास्तीच्या जागा शिवसेनेकडून घेण्यासाठी आग्रही राहण्याबाबत साशंकता आहे. निम्म्या जागा (२४) आम्हाला द्या, असा आग्रह शिवसेनेकडून होऊ शकतो. आपल्या वाट्याला आलेल्या जागांमध्ये मित्र पक्षांचे समाधानही भाजपाला करावे लागणार आहे.

मित्रांची संख्या होतेय कमी

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वातील स्वाभिमानी शेतकरी संघटना आता काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार हे जवळपास निश्चित आहे. विधानसभा निवडणुकीनंतर फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे आ. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीनेही आघाडीसोबत जाण्याचे संकेत दिले आहेत. ठाकूर यांना सोबत ठेवण्यात भाजपाला अपयश आले. आता रासपा, रिपाइं आणि लोकसंग्राम हे तीन पक्ष भाजपासोबत आहेत.


 

Web Title: Shiv Sena's strength in Bihar formation, disorder in BJP; The possibility of seeking half the seats in the Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.